२४ ऐवजी २३ ला चौकशीला बोलवा : रोहित पवार
मनी लाँड्रिंग प्रकरण: बारामती ॲग्रोवरील छाप्यानंतर समन्स
मुंबई : महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळ्याशी संबंधित कथित मनी लाँड्रिंग चौकशीचा एक भाग म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (राष्ट्रवादी) आमदार रोहित पवार यांना अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) 24 जानेवारीला चौकशीसाठी बोलावले आहे. मात्र २४ ऐवजी २३ ला चौकशीला बोलवावे, अशी सूचना रोहित पवार यांनी केली आहे.
’ईडी’ने 5 जानेवारी रोजी बारामती, पुणे, छत्रपती संभाजीनगर आणि पिंपरी-चिंचवड येथील बारामती ॲग्रोशी संबंधित संस्थांवर छापे टाकले होते. ‘ईडी’च्या आधी महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेच्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणाची सुरुवात मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने ऑगस्ट 2019 च्या एफआयआरमधून केली होती.
ईडीचे म्हणणे आहे की, कन्नड सहकारी साखर कारखाना या आजारी कारखान्याची खरेदी करण्यासाठी दुसऱ्या एका कंपनीला बारामती ॲग्रोने तिच्या ‘कॅश क्रेडिट अकाउंट’मधून पाच कोटींची रक्कम देऊन बोली लावण्यास सांगितले. वास्तविक हा निधी बारामती ॲग्रोला खेळते भांडवल म्हणून कर्ज रुपाने मंजूर करण्यात आला होता. अशा प्रकारे बारामतीने ॲग्रोने कर्जापोटी मिळालेली रक्कम दुसऱ्याच कारणासाठी वापरली.
‘ईडी’ने चौकशीसाठी समन्स पाठवल्यानंतर, तिला उत्तर देताना, रोहित पवार यांनी आपले पूर्ण सहकार्य जाहीर केले आणि मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांच्या नेतृत्वाखाली 24 जानेवारीला मुंबईत आंदोलन सुरू होत आहे, म्हणून २४ ऐवजी २२ किंवा 23 जानेवारी रोजी हजर राहण्याची परवानगी मिळावी, अशी मागणी पवार यांनी केली आहे.
“ईडीने समन्स बजावणे ही कोणत्याही अधिकाऱ्याची चूक नाही, त्यांना सहकार्य करणे हे माझे कर्तव्य आहे कारण ते केवळ आदेशाचे पालन करत आहेत आणि त्यांचे काम करत आहेत. आम्ही आतापर्यंत सर्व यंत्रणांना सहकार्य केले आहे आणि यापुढेही करत राहू. त्यामुळे मराठा आरक्षणाचा मुद्दा महत्त्वाचा असून, राज्यभरातून आंदोलक मुंबईत येत आहेत, या संदर्भात 24 तारखेऐवजी मी 22 किंवा 23 तारखेला चौकशीला हजर राहण्यास तयार आहे’’ असे पवार म्हणाले.
मुंबई पोलिस आणि ईडी या कथित घोटाळ्यातील ७० हून अधिक नेत्यांच्या सहभागाची चौकशी करत आहेत, त्यात राष्ट्रवादीचे ५०, काँग्रेसचे नऊ, शिवसेनेचे दोन आणि भाजपचे एक नेते आहेत. उमुख्यमंत्री अजित पवार यांचे एफआयआरमध्ये आहे, मात्र मुंबई पोलिसांनी दाखल केलेल्या गुन्ह्यात त्यांचे काका ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे नाव नाही. ईडी तरीही त्याच्या सहभागाच्या शक्यतेबाबत चौकशी करत आहे.
रोहित पवार यांच्या ‘युवा संघर्ष यात्रे’ने भाजपला अस्वस्थ केले, त्यामुळे सूडबुद्धीने रोहित पवार यांची चौकशी सुरू केली आहे; मात्र ते धाडसी आहेत, अशा गोष्टींनी डगमगणार नाहीत, असा खुलासा पक्षाने केला आहे.