आरआरसी इफेक्ट : माजी मंत्र्यांच्या कारखान्याने घाईने भरली थकबाकी

आवडल्यास ही बातमी शेअर करा

१६ कारखान्यांनी भरली थकबाकी, अद्याप ११७ कोटींहून अधिक थकबाकी शिल्लक!

पुणे: महाराष्ट्र राज्य साखर आयुक्तालयाने ३१ जुलै २०२५ पर्यंतच्या आकडेवारीवर आधारित एक महत्त्वपूर्ण अहवाल प्रसिद्ध केला आहे, ज्यात ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या एफआरपी (Fair and Remunerative Price) थकबाकीसाठी महसूल वसुली प्रमाणपत्र (RRC – Revenue Recovery Certificate) जारी करण्यात आलेल्या साखर कारखान्यांची सद्यस्थिती दर्शवली आहे. या अहवालानुसार, राज्यातील २८ साखर कारखान्यांविरुद्ध आर.आर.सी. जारी करण्यात आले असून, त्यापैकी अनेकांकडे अद्यापही शेतकऱ्यांची एफआरपी थकबाकी शिल्लक आहे. मात्र आरआरसी चा दणका बसताच माजी मंत्र्यांच्या कारखान्यांसह १६ कारखान्यांनी घाईघाईने शेतकऱ्यांचे पैसे चुकते केले.

यामध्ये माजी मंत्री डॉ. तानाजी सावंत, माजी मंत्री सुभाष देखमुख यांच्या साखर कारखान्यांचाही समावेश आहे. आरआरसी कारवाईनंतर या कारखान्यांनी शेतकऱ्यांचे देणे चुकते केले आहे.

साखर आयुक्त सिद्धाराम सालीमठ यांनी एफआरपी थकबाकीबद्दल कडक भूमिका घेतली आहे. त्यामुळे थकबाकीदार कारखान्यांचे धाबे दणाणले आहे. गेल्या आठवड्यात साखर आयुक्त कार्यालयात दिवसभर सुनावण्या सुरू होत्या.

आर.आर.सी. कारवाई आणि थकबाकीची सद्यस्थिती:

साखर आयुक्तालयाच्या आकडेवारीनुसार, या २८ कारखान्यांविरुद्ध एकूण ५४५८८.८८ लाख रुपये (म्हणजे ५४५.८८ कोटी रुपये) रकमेचे आर.आर.सी. जारी करण्यात आले होते . तथापि, ३१ जुलै २०२५ अखेरच्या एफआरपी अहवालानुसार, यापैकी ११७२९.३१ लाख रुपये (म्हणजे ११७.२९ कोटी रुपये) एफआरपी थकबाकी अद्यापही देय आहे .

प्रमुख थकबाकीदार कारखान्यांची नावे आणि देय बाकी (आकडेवारी लाखांमध्ये): या अहवालात नमूद केलेल्या आणि ज्यांच्याकडे अजूनही एफआरपीची मोठी रक्कम थकलेली आहे, अशा काही प्रमुख कारखान्यांची नावे खालीलप्रमाणे:

  • श्री. केदारेश्वर सहकारी साखर कारखाना लि., मु.पो. बोधेगाव, ता. शेवगाव, जि. अहमदनगर: २५७६.०५ लाख
  • श्री सिद्धेश्वर सहकारी साखर कारखाना लि., कुमठे, ता. उत्तर सोलापूर, जि. सोलापूर: २३२५.०३ लाख
  • जयहिंद शुगर प्रा. लि., आचेगाव, ता. दक्षिण सोलापूर, जि. सोलापूर: १९४६.०१ लाख
  • गोकुळ शुगर्स लि., धोत्री, जि. सोलापूर: १५२६.५९ लाख
  • समृद्धी शुगर्स लि., रेणुकानगर, देवीदेहेगाव, ता. घनसावंगी, जि. जालना: १३६३.४२ लाख
  • मातोश्री लक्ष्मी शुगर कोजनरेशन इंड. लि., रुद्धेवाडी, ता. अक्कलकोट, जि. सोलापूर: ५३८.०८ लाख
  • इंद्रेश्वर शुगर मिल्स प्रा. लि., जि. सोलापूर: ४६३.५९ लाख
  • संस्कार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखाना लि., चंद्रभागानगर, भाळवणी, ता. पंढरपूर, जि. सोलापूर: ३४३.६१ लाख
  • सचिन घायाळ शुगर्स प्रा. लि., ता. पैठण, जि. छत्रपती संभाजीनगर: ३१३.२५ लाख

या अहवालानुसार, काही कारखान्यांनी आर.आर.सी. जारी झाल्यानंतर त्यांची संपूर्ण थकबाकी अदा केली आहे. यामध्ये सोलापूर जिल्ह्यातील लोकमंगल ॲग्रो इंड. लि., लोकमंगल शुगर इथेनॉल अँड कोजनरेशन इंड. लि., धाराराशिव जिल्ह्यातील भीमाशंकर शुगर मिल्स लि., तसेच सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुका शेतकरी सहकारी साखर कारखाना लि. आणि किसनवीर सातारा सहकारी साखर कारखाना लि. यांचा समावेश आहे, ज्यांच्यावर आर.आर.सी. होती, परंतु ३१ जुलै २०२५ अखेर त्यांची थकबाकी ‘०’ (शून्य) दाखवली आहे.

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »