‘यशवंत’च्या सभेत जमीन विक्रीचे पडसाद, प्रचंड गोंधळ

पुणे : थेऊर येथील यशवंत सहकारी साखर कारखान्याची 42 वी वार्षिक सर्वसाधारण सभा रविवारी प्रचंड गोंधळात पार पडली. यावेळी बाचाबाचीदेखील झाली. या गोंधळातच सर्व विषय आवाजी मतदानाने मंजूर झाल्याचे जाहीर करण्यात आले.
कोलवडी येथील लक्ष्मी गार्डन येथे पार पडलेल्या सर्वसाधारण सभेची सुरुवात करताना, कारखान्याचे चेअरमन सुभाष जगताप म्हणाले, कारखान्याच्या सभासदांच्या हिताचा विचार करता आणि यशवंत पुन्हा गतवैभवास प्राप्त व्हावा यासाठी सर्व संचालक मंडळाने गेल्या काही महिन्यांमध्ये मोठा प्रयत्न करून शासन दरबारी आपल्या भूमिका मांडून मुख्यमंत्री तसेच उपमुख्यमंत्री यांच्याशी संवाद साधून या निर्णयापर्यंत आपणास येता आले . संचालक मंडळाने कारखान्याच्या खर्चातील जवळपास 100 कोटी रुपये वाचवले असून ज्या बँकांची देणे आहेत त्यांना वन टाइम सेटलमेंट नुसार पैसे देण्यात आलेले आहेत त्यामुळे कारखान्याची सर्व जमीन आता मोकळी झाली आहे.
अध्यक्षांच्या मनोगतनंतर कारखान्याचे कार्यकारी संचालक कैलास जरे यांनी विषय पत्रिका पटलावर मांडली त्यांनी एक एक विषय वाचून दाखवले आणि सभासदांकडे मंजुरीसाठी आवाहन केले.
यादरम्यान सभास्थळी गोंधळ सुरू झाला. कारखान्याचे सभासद विकास लवांडे यांनी विषय पत्रिकेमधील मागील सभेचा इतिवृत्तांत वाचून कायम करणे या अंतर्गत वाचन करण्यात आलेले काही विषय अधोरेखित केले जी सभा केवळ पाच ते दहा मिनिटात उरकण्यात आली त्या सभेचा इतिवृत्तांत वाचण्यासाठी आज 20 ते 25 मिनिटे लागतात यावरून हे विषय आम्हास मान्य नाहीत, असा आक्षेप घेतला.
त्याचवेळी कारखान्याच्या मालकीची जी जमीन विकायची आहे ती अहवालात दिलेल्या गट क्रमांक आणि प्रत्यक्ष संचालक मंडळाने कृषी उत्पन्न बाजार समितीत दिलेल्या अंडरटेकिंग मधील गट क्रमांक तफावत असल्याचे निदर्शनास आणून दिले. यावेळी मोठा गोंधळ झाला त्यावर अध्यक्ष सुभाष जगताप यांनी अहवालातील प्रिंटिंग मिस्टेक असल्याचे सांगितले, यावर अनेक सभासद हसले.
कृषी उत्पन्न बाजार समिती विकण्यात येणाऱ्या जमिनीचा दर परिसरातील सद्यस्थितीला अनुसरून नसल्याने कारखान्याचे कोट्यावधी रुपयांचे नुकसान होत असल्याचे विकास लवांडे यांनी निदर्शनास आणून दिले तसेच संचालक मंडळ अनेक गोष्टी सभासदांपासून लपवत असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला.