शहाजीराव भड (वाढदिवस विशेष)
दी डेक्कन शुगर टेक्नॉलॉजिस्ट असोसिएशन (इंडिया) अर्थात ‘डीएसटीए’चे विद्यमान अध्यक्ष, एस. एस. इंजिनिअर्स या नामवंत कंपनीचे संस्थापक आणि साखर उद्योग क्षेत्रातील उत्तुंग व्यक्तिमत्त्व श्री. शहाजीराव भड अर्थात एस. बी. भड यांचा १ जून रोजी वाढदिवस. त्यांना ‘शुगरटुडे’च्या वतीने खूप खूप शुभेच्छा!
१९८० साली स्थापन झालेल्या त्यांच्या एस. एस. इंजिनिअर्सने ४५ साखर कारखाने (टर्न की प्रकल्प), २७० मिल्स, ४४ सहवीजनिर्मिती प्रकल्प, १२० बॉयलर्स अशा प्रकल्पांची उभारणी करून नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. बजाज हिंदुस्थान या कंपनीच्या प्रत्येकी दहा हजार टन प्रति दिन गाळप क्षमता असलेल्या तीन युनिटचा त्यात समावेश आहे.
श्री. भड यांनी 1972 मध्ये पुण्यातील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातून मेकॅनिकल इंजिनिअरची पदवी घेतली. चांगले गुण घेऊन पास झाल्याने नोकरीचा प्रश्न सुटला होता. वालचंद नगर इंडस्ट्रीजमध्ये डिझाईन इंजिनिअर म्हणून शहाजीराव भड रुजू झाले. तिथे साधारण पाचेक वषे काम केले. त्यानंतर त्यांनी जे.पी. मुखर्जी अॅन्ड असोसिएटमध्ये सल्लागार म्हणून काही काळ काम केले. या अनुभवाच्या जोरावर त्यांनी स्वतःची सल्लागार कंपनी सुरू केली.
काही वर्षे उद्योगांना तांत्रिक सल्ला दिल्यानंतर ते प्रत्यक्ष उत्पादन क्षेत्रात उतरले. अंगभूत संशोधक वृत्ती, सतत नवनव्या कल्पनांचा पुरस्कार आणि त्या तडीस नेण्यासाठीची जबरदस्त इच्छाशक्ती या गुणांच्या जोरावर श्री. भड यांनी भोसरी एमआयडीसीत ‘एस.एस इंजिनियर्स’ या स्वतःच्या कंपनीची तुटपुंज्या भांडवलावर स्थापना केली. कंपनी नावारूपास आणण्यासाठी त्यांनी प्रचंड मेहनत घेतली. आज एस. एस. इंजिनिअर्स साखर उद्योग इंजिनिअरिंग क्षेत्रातील आघाडीचे नाव आहे. ‘टर्न की प्रोजेक्ट्स’मध्ये एस. एस. इंजिनिअर्सचा विशेष दबदबा आहे. आज एस. एस. इंजिनिअर्समध्ये अभियंते, संशोधकांसह शेकडो लोक काम करतात..
पिंपरी-चिंचवड उद्योगनगरीच्या भोसरी एमआयडीसीतील ही कंपनी जागतिक पातळीवर नावाजलेली कंपनी बनली आहे. श्री. भड यांच्या मार्गदर्शनाखाली कंपनीने अवघ्या ३४ वर्षात यशोशिखर गाठले आहे.
श्री. भड मूळचे बार्शी तालुक्यातील (जि. सोलापूर) गौडगांवचे. त्यांचा जन्म शेतकरी कुटुंबात झाला. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीचा सामना करत शेताच्या बांधावरून सुरू झालेला त्यांचा प्रवास अनेक संकटांवर मात करत ग्लोबल उद्योगापर्यंत पोहचला आहे. त्यांची जीवनगाथा तरूण पिढीसाठी केवळ मार्गदर्शकच नाही, तर सदैव प्रेरणादायी आहे.