‘सह्याद्री’च्या बॉयलरमध्ये स्फोट झाल्याचे वृत्त चुकीचे : व्यवस्थापन

कराड : सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या बॉयलरमध्ये स्फोट झाल्याचे वृत्त चुकीचे आहे. बॉयलरमध्ये स्फोट वगैरे झालेला नसून, चिमणीमध्ये चोकअप झाल्यामुळे साईड प्लेट फाटली आणि मोठा आवाज झाला, असे स्पष्टीकरण कारखान्याचे कार्यकारी संचालक आबासाहेब पाटील यांनी दिले आहे.
सह्याद्रि सहकारी साखर कारखान्याच्या नवीन विस्तारवाढ प्रकल्पामध्ये दिनांक 10 मार्च 2025 पासून नवीन थरमॅक्स मेक 150 टनी बॉयलरचे थरमॅक्स कंपनीच्या इंजिनिअरच्या मार्गदर्शनाखाली व मे. के. बॉव्हेट यांच्या तज्ज्ञांमार्फत टेस्टिंग व ब्लो ऑफचे काम चालु आहे. गेल्या १० मार्चपासून आजपर्यंत बॉयलर व्यवस्थित चालू आहे. 19 मार्च २०२५ पर्यंत एकुण 16 ब्लो ऑफ दिलेले आहेत, असे कारखान्याच्या व्यवस्थापनाने जारी केलेल्या पत्रकात म्हटले आहे.
बॉयलरमधून निघणारी धूर मिश्रित राख वेगळी करण्याकरिता ईएसपी नावाची यंत्रणा बॉयलर व चिमणीच्या मध्ये बसविलेली असते. ही यंत्रणा चोकअप होऊन तिची साईड प्लेट फाटल्यामुळे मोठा आवाज झाल्याने ही दुर्घटना घडली आहे. याठिकाणी कोणत्याही प्रकारे आग लागलेली नाही व कोणत्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही. फक्त सदर ठिकाणी निरीक्षण करणारे लोक, मोठा आवाज झाल्यामुळे पळत असताना त्यातील तिघे जण किरकोळ जखमी झालेले आहेत. त्यांना ताबडतोब कृष्णा चॅरिटेबल टस्ट्र कराड येथे उपचारा करिता पाठविलेले असून, आज रात्रीपर्यंत त्यांना डिस्चार्ज मिळणार आहे, असेही कार्यकारी संचालक पाटील यांनी स्पष्ट केले.
बॉयलरमध्ये मोठा स्फोट झालेला नाही. तरी सभासद शेतकरी बंधूंनी विविध सोशल मिडियावर सदर घटनेबाबत येणाऱ्या अफवांवर विश्वास ठेवू नये, ही यंत्रणा दुरुस्त करुन पुन्हा लवकरात लवकर चालू करण्याचा प्रयत्न करत आहोत, अशी माहिती व्यवस्थापनाच्या वतीने कारखान्याचे कार्यकारी संचालक आबासाहेब पाटील यांनी दिली. सध्या कारखान्याची निवडणूक लागलेली आहे, या घटनेचे राजकारण होऊ नये, अशी अपेक्षाही पाटील यांनी व्यक्त केली.