‘शाहू साखर’चे सर्वेसर्वा समरजित घाटगे यांनी अखेर फुंकली ‘तुतारी’
कोल्हापूर – श्री छत्रपती शाहू सहकारी साखर कारखान्याचे सर्वेसर्वा आणि भाजपचे युवा नेते समरजितसिंह घाटगे यांनी अखेर राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षामध्ये प्रवेश करून, ‘तुतारी’ फुंकली आहे. ते कागलमधून आमदार होण्यासाठी इच्छुक आहेत.
सध्या या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व पालकमंत्री हसन मुश्रीफ करतात. त्यांना घाटगे आव्हान देतील. म्हणजे या मतदारसंघात शरद पवार विरूद्ध अजित पवार अशीच लढाई आगामी विधानसभा निवडणुकीत दिसून येईल. मात्र या निमित्ताने दक्षिण महाराष्ट्रालातील भाजपचा एक चांगला नेता पक्षाच्या हातून निसटला आहे.
लोकसभा निवडणुकीमध्ये साखर उद्योगाने महत्त्वाची भूमिका बजावली होती. आता आगामी विधानसभा निवडणुकीतही साखर उद्योगाचा महत्त्वाचा रोल राहील, असेच या घडामोडींवरून सूचित होते.
कागलच्या गैबी चौकात ३ सप्टेंबर रोजी विशाल सभा झाली. सभेला राष्ट्रवादीचे अध्यक्ष ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी संबोधित केले. घाटगे यांना साथ देण्याचे आवाहन करताना, त्यांचा आम्ही उचित सन्मान करू, असे आश्वासनही पवारांनी दिले.
यावेळी घाटगे म्हणाले, आजची सभा म्हणजे २००९ च्या स्व. सदाशिवराव मंडलिक यांच्या सभेची आठवण करून देत आहे. महाराष्ट्राच्या ओरिजिनल वस्तादाची ही सभा आहे. कागलच्या भविष्यासाठी, कोणाला पाडण्यापेक्षा विजय मिळवण्यासाठी, कागल, आजरा आणि गडहिंग्लज च्या विकासासाठी मला निवडून द्या.
कागलच्या विकासासाठी मलाही काम करायचे आहे. कागलच्या जनतेने मला बळ दिल्यामुळे या मतदारसंघात माझा विजय निश्चित आहे, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.