समीर सलगर : वाढदिवस शुभेच्छा

आवडल्यास ही बातमी शेअर करा

पद्मभूषण डॉ. नागनाथअण्णा नायकवडी हुतात्मा किसन अहिर सहकारी साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक आणि साखर उद्योगाचे गाढे अभ्यासक, तंत्रज्ञ श्री. समीर सलगर यांचा ३ फेब्रुवारी रोजी वाढदिवस. यानिमित्त त्यांना ‘शुगरटुडे’ परिवाराकडून वाढदिवसाच्या मन:पूर्वक हार्दिक शुभेच्छा.

श्री. समीर भागवत सलगर हे मेकॅनिकल इंजिनिअर असून, टेंभुर्णी (माढा) चे सुपुत्र आहेत. शुगर इंजिनिअरिंग आणि बॉयलर प्रोफे.चेही त्यांनी शिक्षण घेतलेले आहे. त्यामुळे ते साखर उद्योग क्षेत्रासाठी परिपूर्ण व्यक्तिमत्त्व बनले आहेत. खासगी आणि सहकारी अशा दोन्ही प्रकारच्या साखर उद्योगाचा विविध पदांवर काम करण्याचा त्यांना तब्बल २७ वर्षांचा गाढा अनुभव आहे.

विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखाना, उगार शुगर, लोकमंगल शुगर या प्रतिथयश कारखान्यांमध्ये त्यांनी तब्बल आठ वर्षे चिफ इंजिनिअर म्हणून कर्तव्य बजावताना, भरीव योगदान दिले आहे.

२०१५ मध्ये ते एमडी पात्रता परीक्षा उत्तम गुणांनी उत्तीर्ण झाले आणि त्यांचा एमडी पॅनलमध्ये समावेश झाला आणि विविध नामवंत साखर कारखान्यांमध्ये या सर्वाधिक जबाबदारीच्या पदावर काम करण्याचा त्यांना सुमारे नऊ वर्षांचा अनुभव आहे. माजी मुख्यमंत्री दिवंगत नेते विलासराव देशमुख यांचा लातूर जिल्ह्यातील विकास सहकारी साखर कारखाना (सध्याचा विलास सहकारी साखर कारखाना) येथे तीन वर्षे त्यांनी एमडी म्हणून काम पाहिले आहे.


सोलापूर जिल्ह्यातील सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्यामध्ये तीन वर्षे कार्यकारी संचालक पदाची यशस्वी धुरा सांभाळण्याबरोबरच, त्यांनी ट्वेंटीवन शुगर्स लि. (लातूर) येथे अडीच वर्षे व्हाईस प्रेसिडेंट म्हणून आपल्या कामाचा ठसा उमटवला.

रोज १८००० टन गाळप क्षमता असलेल्या, तसेच ५२ मेवॅ कोजन आणि २०० केएलपीडी क्षमता असलेल्या तीन साखर कारखान्यांचे कार्यसंचालन श्री. सलगर यांनी यशस्वीपणे केले आहे.
याखेरीज त्यांच्या अनेक उपलब्धीदेखील आहेत. ३५०० टन प्रतिदिन गाळप क्षमता असलेल्या कारखान्याची क्षमता त्यांनी अवघ्या पाच महिन्यांमध्ये प्रति दिन ७५०० टनांपर्यंत नेऊन, एक विक्रमच प्रस्थापित केला आहे. स्टीम वापर २७ टक्क्यांपर्यंत नेण्याचे उद्दिष्टदेखील त्यांनी साधले आहे.

साखर उद्योगात पाण्याचे सुयोग्य व्यवस्थापन करण्याबाबत त्यांनी केलेले संशोधन विविध आंतरराष्ट्रीय जर्नल्समध्ये प्रसिद्ध झाले असून, ते या क्षेत्रातील नामवंत तज्ज्ञ आहेत. त्यांनी विविध नामवंत वृत्तपत्रांसाठी विपुल लिखाणदेखील केले आहे. राज्य सरकारच्या वतीने घेतल्या जाणाऱ्या बॉयलर परीक्षेसाठी ते राज्यपाल नियुक्त परीक्षक आहेत. तसेच शासनाच्या विविध समित्यांवरही त्यांनी काम केले आहे.

व्यावसायिक कामांमध्ये स्वत:ला झोकून देताना, अनेकांचे स्वत:च्या प्रकृती – आरोग्याकडे दुर्लक्ष होते. स्वत:साठी वेळच मिळत नाही, अशी साधारणपणे तक्रार असते. मात्र समीर सलगर त्यास अपवाद ठरतात. त्यामुळे त्यांचा फिटनेस जबरदस्त आहे. रोज सकाळी ते साडेपाच ते साडेसात असे दोन तास व्यायाम करतात. कदाचित उत्तम आरोग्य आणि फिटनेस असल्यामुळेच ते साखर उद्योगात आपली छाप सोडण्यात यशस्वी ठरले आहेत. त्यांना वाढदिवसानिमित्त पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा!

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »