साखर संचालकपदी डॉ. संजयकुमार भोसले
पुणे : सहकार खात्याचे पुणे विभागीय सहनिबंधक डॉ. संजयकुमार भोसले यांची साखर संचालकपदी (प्रशासन) पदोन्नतीने नियुक्ती करण्यात आली आहे. उत्तम इंदलकर यांच्या निवृत्तीमुळे हे पद रिक्त झाले होते.
राज्य सरकारच्या सहकार पणन व वस्त्रोद्योग विभागाने ५ जुलै रोजी भोसले यांच्या नियुक्तीचा आदेश जारी केला. श्री. भोसले हे पुणे विभागीय सहनिबंधक पदावर (गट अ) कार्यरत होते. त्यांची अपर निबंधक (सहकारी संस्था) या पदावर पदोन्नती करण्यात येऊन त्यांची साखर आयुक्तालयात संचालकपदी बदली करण्यात आली. यापूर्वी या पदावर उत्तम इंदलकर कार्यरत होते ते 31 मे रोजी सेवानिवृत्त झाल्याने सदर जागा रिक्त झालेली होती.
भोसले यांच्या जागी औरंगाबाद विभागीय सहनिबंधक पदी कार्यरत असलेले योगीराज सुर्वे यांची बदलीने नियुक्ती झालेली आहे.
सहकार विभागाने काढलेल्या अन्य आदेशांमध्ये सहव्यवस्थापकीय संचालक महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ पुणे या रिक्त पदावर संतोष पाटील यांची नियुक्ती झाली असून अप्पर निबंधक, सहकारी संस्था (तपासणी व निवडणुका) या बदलीने रिक्त झालेल्या पदावर लातूर विभागीय निबंधक डॉ. ज्योती लाटकर यांची नियुक्तीचे आदेश काढलेले आहेत.
तसेच अप्पर निबंधक, सहकारी संस्था (पतसंस्था) मुख्यालय, पुणे या रिक्त पदावर श्रीकृष्ण वाडेकर यांची नियुक्ती झालेली आहे. आणि अप्पर निबंधक तथा कार्यकारी संचालक, महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ, पुणे या रिक्त पदावर नागपूर विभागीय निबंधक संजय कदम यांची पदोन्नतीने नियुक्ती झाल्याचे आदेश काढण्यात आलेले आहेत. यापूर्वीच सहकार विभागातील १६ जूनला देखील काही अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश शासनाने पारित केले आहेत.
डॉ. संजयकुमार श्रीमंतराव भोसले यांचा परिचय
साखर कारखाने उद्योग व त्यातून शेतकऱ्यांचे अर्थचक्र अवलंबून असल्याने शेतकऱ्यांच्या समस्यांना व शेती पूरक उद्योगांना चालना देण्याचे कार्य प्रशासकीय माध्यमातून डॉ. संजयकुमार भोसले यांनी अविरतपणे सुरु आहे. डॉ. संजयकुमार श्रीमंतराव भोसले (54) यांचे शिक्षण बी.ए.एम.एस., एम.ए. (राज्यशास्त्र)असून सध्या सहकार विभागातील प्रशासकीय सेवेत कार्यरत आहेत.
त्यांचे वडील मा. प्राचार्य श्रीमंतराव भोसले हे रयत शिक्षण संस्थेचे स्थायी सदस्य आहेत. डॉ. संजयकुमार भोसले यांचे सामाजिक संस्थांच्या माध्यमातून कार्य सुरु आहे. सरकोली येथील भैरवनाथ इमारत बांधकामात पुढाकार घेऊन इमारत पूर्ण केली आहे. साखर कारखान्यासाठी कामकाज करीत असतांना, इथेनॉल ब्लेंडिंग प्रोग्रामसाठी राष्ट्रीय पातळीवरील समितीमध्ये कामकाज व इथेनॉल निर्मितीसाठी विशेष प्रयत्न केले आहेत.
महिला बचत गटांची निर्मिती, ३३ हजार महिलांचे संघटन करून स्वयंरोजगारासाठी प्रोत्साहन, महिला बचत गटांची जिल्हास्तरीय आरोग्य विमा सहकारी संस्था स्थापन करून १० हजार कुटुंबांना आरोग्य विम्याचे लाभ मिळवून दिले आहेत. शेती आणि ग्रामविकास यासाठी संस्थेमार्फत सातत्त्याने मार्गदर्शन शिबीर उपक्रम राबविला जातो. सोलापूर या जिल्हयातील युवकांना स्वयंराजेगारासाठी प्रेरित करणे व त्यासाठी उद्योजकता केंद्राच्या माध्यमातून गेली २० वर्ष प्रशिक्षण शिबीर घेतली आहेत. त्यांनी विविध ग्रंथाचे संपादन देखील केले आहे.
‘शुगरटुडे’ मासिकाच्या वतीने श्री. भोसले यांना खूप खूप शुभेच्छा!