संत नामदेव

आज मंगळवार, जुलै २२, २०२५ युगाब्द : ५१२७
भारतीय राष्ट्रीय सौर आषाढ दिनांक ३१, शके १९४७
सूर्योदय : ०६:१२सूर्यास्त : १९:१८
चंद्रोदय : ०४:२०, जुलै २३चंद्रास्त : १७:१८
शालिवाहन शक : संवत् : १९४७
संवत्सर: विश्वावसू
दक्षिणायन
ऋतु : ग्रीष्म
चंद्र माहआषाढ़
पक्ष : कृष्ण पक्ष
तिथि : द्वादशी – ०७:०५ पर्यंत
क्षय तिथि : त्रयोदशी – ०४:३९, जुलै २३ पर्यंत
नक्षत्र : मृगशीर्ष – १९:२४ पर्यंत
योग : ध्रुव – १५:३२ पर्यंत
करण : तैतिल – ०७:०५ पर्यंत
द्वितीय करण : गर – १७:५१ पर्यंत
क्षय करण : वणिज – ०४:३९, जुलै २३ पर्यंत
सूर्य राशि : कर्क
चंद्र राशि : वृषभ – ०८:१५ पर्यंत
राहुकाल : १६:०१ ते १७:४०
गुलिक काल : १२:४५ ते १४:२३
यमगण्ड : ०९:२८ ते ११:०७
अभिजित मुहूर्त : १२:१९ ते १३:११
दुर्मुहूर्त : ०८:४९ ते ०९:४१
दुर्मुहूर्त : २३:४० ते ००:२३, जुलै २३
अमृत काल : ११:१४ ते १२:४३
वर्ज्य : ०३:१७, जुलै २३ ते ०४:४७, जुलै २३
संत नामदेव हे संत ज्ञानेश्वरांच्या कालखंडातील महान संत. त्यांचा जन्म २६ ऑक्टोबर १२७० (कार्तिक शुद्ध एकादशी) रोजी नरसी-बामणी (नरसी नामदेव, जि. हिंगोली) येथे झाला. त्यांचे नाव नामदेव दामाशेटी रेळेकर. त्यांच्या आईचे नाव गोणाई होते. त्यांचे बालपण पंढरपुरात गेले. त्यांनी लहानपणापासूनच श्रीविठ्ठलाची भक्ती केली. संत जनाबाई त्यांच्याच परिवारातील सदस्य होय.
त्यांच्या अभंग, ओव्या, किर्तनकलेचा नावलौकिक प्रत्यक्ष पांडुरंगाला देखील डोलायला भाग पाडणारा होता. त्यांनी संत ज्ञानेश्वरांच्या संजीवन समाधीनंतर सुमारे ५० वर्षे भागवतधर्माचा प्रचार केला. त्यांची अभंगगाथा (सुमारे २५०० अभंग) प्रसिद्ध आहेत. त्यांनी शौरसेनी भाषेत काही अभंग रचना (सुमारे १२५ पदे) केली. त्यातील ६२ अभंग (नामदेवजी की मुखबानी) शीख पंथाच्या ‘गुरु ग्रंथसाहेब’मध्ये गुरुमुखी लिपीत घेतलेले आहेत. शीख बांधव ‘नामदेव बाबा’ म्हणून त्यांचे गुणगान गातात.
भगवद्भक्तांच्या चरणधुळीचा स्पर्श व्हावा म्हणून त्यांनी पंढरपूर येथील विठ्ठल मंदिराच्या महाद्वारी १३५० साली आजच्याच दिवशी संजीवन समाधी घेऊन ‘पायरीचा दगड’ होण्यात धन्यता मानली. हीच पहिली पायरी ‘संत नामदेवांची पायरी म्हणून ओळखली जाते.
आज (आषाढ कृ. १३, (२ ऑगस्ट) संत नामदेव महाराज संजीवन समाधी दिन
झाडलोट करी जनी । केर भरी चक्रपाणी ॥१॥
पाटी घेऊनियां शिरीं । नेऊनियां टाकी दुरी ॥२॥
ऐसा भक्तिसी भुलला । नीच कामें करुं लागला ॥३॥
जनी ह्मणे विठोबाला । काय उतराई होऊं तुला ॥४॥
संत जनाबाई श्री क्षेत्र पंढरपूर येथे महाद्वारी, आषाढ कृष्ण त्रयोदशी शके १२७२ या दिवशी समाधिस्थ होऊन पांडुरंगात विलीन झाल्या.
श्रीरामदास स्वामी शिष्य – कल्याण स्वामी हे ‘योगभ्रष्ट’ तपस्वी होते असा उल्लेख ‘दासविश्रमधाम’ सारख्या जुन्या शास्त्रात आढळतो.
प्राप्य पुण्यकृतां लोकानुषित्वा शाश्वती: सम:। शुचीनां श्रीमतां गेहे योगभ्रष्टोऽभिजयते ॥४१॥
अर्थ: जो योगापासून पतित झाला आहे, त्याला उच्च लोक (स्वर्ग इ.) प्राप्त होतात जिथे केवळ पुण्यकर्मे करणारे लोकच पात्र आहेत आणि तिथे असंख्य वर्षे राहिल्यानंतर, तो धार्मिक आणि श्रीमंत लोकांच्या घरात जन्म घेतो. (४१) (श्रीमत भगवद्गीता अध्याय ६ श्लोक ४१)
ते योगी म्हणूनही प्रसिद्ध होते जे दररोज असंख्य योगाभ्यास करायचे. रामदासी पंथ आणि भक्त श्री कल्याण स्वामींना ‘योगीराज’ म्हणत. त्यांचे रेखाटन ‘गर्भासनाची योगमुद्रा’ मध्ये आहे. ते दररोज १२०० सूर्यनमस्कार करत असत. दररोज श्री कल्याण स्वामी उर्मोदी नदीतून मोठ्या तांब्याच्या भांड्यांमध्ये श्री समर्थ रामदास स्वामींना स्नान घालण्यासाठी पाणी आणत असत. हे तांब्याचे भांडे आता सज्जनगड येथे आहेत. त्यांचे शरीर खूप मजबूत असल्याचे सांगितले जाते. ते कुंडल, भस्म आणि मुद्रिका असे कपडे घालत असत.
कल्याण स्वामींचे १७१४ मध्ये आषाढ शुद्ध त्रयोदशी रोजी परांडा जिल्हा धाराशिव (उस्मानाबाद) येथे निधन झाले. त्याला योग-अंत (स्वतःच्या योगिक शक्तीने/स्वतःच्या इच्छेने समाधी) असे म्हणतात. त्यांचे अंत्यसंस्कार परांडा जवळील डोमगाव येथे झाले . त्यांच्या मृत्युनंतर समर्थ रामदास स्वामी आणि कल्याण स्वामी यांच्या अस्थी केशव स्वामींनी मिसळल्या.
आज कल्याण स्वामी पुण्यतिथी आहे.
‘ मेरी जूता है जपानी
ये पतलून इंग्लिशतानी
सर पे लाल टोपी रूसी
फ़िर भी दिल है हिंदुस्तानी ‘
- पार्श्व गायकमुकेश – “पहली नजर” ह्या चित्रपटाव्दारे “दिल जलता है तो जलने दे……” ह्या गाण्याने पार्श्वगायनाने सुरवात केली. गाणे कुंदनलाल सैगलचे आहे म्हणणारे बहूतेक रसिक ही पैज हरले होते.
स्वत: सैगलही हे गाणे ऐकून अचंबित झाले होते. कारण आवाज थेट तयांच्या सारखाच होता. हे गाणे गायले होते मुकेश चंद माथूर या २२ वर्षीय तरूणाने जो पूढे चित्रपटसृष्टीतला महान गायक मुकेश बनला…….या गाण्याने भारतभर त्याला ओळख मिळवून दिली.
मुकेश प्रत्यक्ष जीवनात अत्यंत भावूक आणि संवेदनशील होते. एकदा एक मुलगी खूप आजारी पडली. तिला मुकेश खूप आवडत असत. आजार वाढू लागला तसे तिने आई जवळ मागणी केली की मला जर मुकेश यांनी गाणे म्हणून दाखवले तर मी लवकर बरी होईल. आईने तिला समजाविण्याचा खूप प्रयत्न केला की- ते खूप नामवंत गायक आहेत, ते कसे येऊ शकतील? शिवाय त्यानां खूप पैसेही द्यावे लागणार. पण तिचा हट्ट सुरूच…शेवटी डॉक्टरांनी मुकेशशी संपर्क साधला. आणि खरोखरच मुकेश त्या मुलीला भेटायला हॉस्पिटलमध्ये गेले आणि गाणे ही गायले. मुलीच्या चोहऱ्या वरील आनंद बघून ते म्हणाले- ती आता जितकी आनंदी दिसतेय त्याच्या किती तरी पट आनंद मला झाला आहे. त्यांच्या याच संवेदनशीलतेमुळे त्यांचे गाणे बहूदा हृदया पासून येत असावे.
१९२३ : राष्ट्रीय फ़िल्म पुरस्कार सन्मानित हिंदी चित्रपट पार्श्व गायक मुकेश चंद माथुर तथा मुकेश यांचा जन्म ( मृत्यू : २७ ऑगस्ट १९७६ )
श्रीराम अभ्यंकर हे भारतीय-अमेरिकन गणितज्ञ, बीजगणित व बैजिक भूमिती या क्षेत्रांत मूलगामी संशोधनासाठी प्रसिद्ध होते. अभ्यंकर यांचा जन्म २२ जुलै १९३० रोजी भारताच्या मध्य प्रदेश राज्यातील उज्जैन येथे झाला. त्यांचे वडील आधी उज्जैनला व नंतर ग्वाल्हेरच्या महाविद्यालयात गणिताचे प्राध्यापक होते. श्रीराम अभ्यंकर यांचे इंटरपर्यंतचे शिक्षण ग्वाल्हेरमध्ये झाले.
भौतिकशास्त्रातील पदवी घेण्याकरिता त्यांनी मुंबईतील रॉयल इन्स्टिट्यूट ऑफ सायन्समध्ये प्रवेश घेतला.
त्याच सुमारास त्यांना मुंबईत नव्याने सुरू झालेल्या टाटा मूलभूत संशोधन संस्थेत अनेक मान्यवरांची गणितावरील व्याख्याने ऐकण्याची संधी मिळाली.
तेथे आमंत्रित व्याख्यात्यांपैकी मार्शल स्टोन यांच्याकडून अभ्यंकर यांना भारताबाहेर जाऊन पुढील शिक्षण घेण्याची प्रेरणा मिळाली. मात्र, पुढील शिक्षण भौतिकशास्त्रात घेण्याऐवजी गणितात घ्यावे, असा निर्णय त्यांनी टीआयएफआरमधील गणिती दामोदर धर्मानंद कोसंबी आणि रॉयल इन्स्टिट्यूट ऑफ सायन्समधील गणित विभाग प्रमुख पेसी मसानी यांच्याशी झालेल्या विचारविनिमयानंतर घेतला.
हार्व्हर्ड विद्यापीठाची गणितातील एम.ए. पदवी अभ्यंकर यांनी वर्षभरातच मिळविली (१९५२), तर पीएच.डी. पदवी गणितज्ञ ऑस्कर झरिस्की यांच्या मार्गदर्शनाखाली तीन वर्षांत मिळविली (१९५५). त्यांनी लोकल युनिफॉर्मायझेशन ऑन अल्जिब्राइक सर्फेसेस ओव्हर मॉड्युलर ग्राउंड्ज फील्ड्स हा प्रबंध लिहिला. अनेक विद्यापीठांनी त्यांना मानाच्या पदांवर आमंत्रित केले होते.
स्वतःचे संशोधन आणि गणिती संकल्पना अनेकांपर्यंत पोहोचविण्यासाठी त्यांनी काही वर्षे जगभर भ्रमंती केली. त्यानंतर १९६७ पासून शेवटपर्यंत मार्शल डिस्टिंग्विश्ड प्रोफेसर ऑफ मॅथेमॅटिक्स या पदावर राहिले. नंतरच्या काळात अभ्यंकर अमेरिकेतील पर्ड्यू विद्यापीठात १९८७ मध्ये औद्योगिक अभियांत्रिकी आणि १९८८ मध्ये संगणकशास्त्र या विद्याशाखांचेही प्राध्यापक झाले.
अभ्यंकर यांच्या संशोधनकार्यक्षेत्रातील काही वैशिष्ठ्यपूर्ण विषय पुढीलप्रमाणे आहेत : संविशेषतांचे वियोजन, सौम्य आवरणी व बैजिक मूलभूत गट, मितिरक्षी भूमिती, जे. डब्ल्यू. यंग यांच्या टॅब्लोतील प्रगणनीय समचय आणि गाल्वा गटातील बहुघाती राशी समीकरणे इत्यादी काही वैशिष्ठ्यपूर्ण विषय त्यांच्या संशोधन कार्यक्षेत्रातील होते.
अभ्यंकर यांनी २०० शोधनिबंध आंतरराष्ट्रीय गणितविषयक शोधनियतकालिकांतून प्रकाशित केले. त्यांनी अनेक पुस्तकेही लिहिली. त्यापैकी अल्जिब्रेक स्पेस कर्व्हज (१९७१), वेटेड एक्सपान्शन्स फॉर कॅनॉनिकल डिसिन्ग्युलरायझेशन (१९८२), एन्युमरेटिव्ह कॉम्बिनेटोरिक्स ऑफ यंग टॅब्लो (१९८७), अल्जिब्रेक जिओमेट्री फॉर सायन्टिस्टस अॅण्ड इंजिनिअर्स (१९९०), लोकल अॅनॅलिटिक जिओमेट्री (२००१) आणि लेक्चर्स ऑन अल्जिब्रा-व्हॉल्यूम १ (२००६) ही पुस्तके गणिती क्षेत्रात प्रसिद्ध आहेत.
गणितातील वैविध्यपूर्ण व वैशिष्ठ्यपूर्ण कामगिरीमुळे अभ्यंकरांना पर्ड्यू विद्यापीठातर्फे मॅकॉय पारितोषिक (१९७३), मॅथेमॅटिक्स असोसिएशन ऑफ अमेरिका यांच्यातर्फे लेस्टर फोर्ड व शोविनेट पारितोषिक (१९७८), भारतातील इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स यांच्यातर्फे ‘विज्ञानसंस्था रत्न’ इत्यादी पुरस्कार मिळाले. अशा या प्रसिद्ध गणितज्ञाचे २ नोव्हेंबर २०१२ रोजी निधन झाले.
१९३० : भारतीय-अमेरिकन गणिती श्रीराम शंकर अभ्यंकर यांचा जन्म ( मृत्यू : २ नोव्हेंबर २०१२ )
- घटना :
१९०८ : “देशाचे दुर्दैव” हा जहाल अग्रलेख लिहिल्यामुळे लो. टिळकांना ६ वर्षाची काळ्या पाण्याची शिक्षा.
१९३१ : फर्ग्युसन महाविद्यालयाच्या ग्रंथालयात वासुदेव बळवंत गोगटे यांनी सर जॉन हॉटसन या मुंबई प्रांताच्या राज्यपालावर गोळ्या झाडल्या. पण हॉटसन बचावले.
१९३३ : विली पोस्ट ह्या वैमानिकाने ७ दिवस १८ तास ४९ मिनिटे या विक्रमी वेळात पृथ्वी प्रदक्षिणा पूर्ण केली.
१९४२ : ज्यूंचे शिरकाण – वॉर्सोतून ज्यूंना तडीपार करणे सुरू झाले
१९४४ : पोलंडमध्ये कम्युनिस्ट राजवटीची सुरवात.
१९४६ : ergunya ह्या दहशत वादी संघटनेने जेरुसलेम मधील ब्रिटिश मुख्यालयावर हल्ला केला त्यात ९० जण मृत्युमुखी पडले.
१९४७ : आज २२ जुलै भारतीय राष्ट्राभिमान व अस्मिता यांचे प्रतिक बनलेल्या राष्ट्रध्वजाचा आज ७७ वा वाढदिवस.
२२ जुलै १९४७ रोजी घटना समितीच्या बैठकीत ‘तिरंगी ध्वज’ भारताचा अधिकृत राष्ट्रीय ध्वज म्हणून स्वीकृत करण्यात आला.
२४ मार्च रोजी इंंग्रजांनी लवकरच भारत सोडून जाण्याचा आपला निर्णय जाहीर केला. स्वतंंत्र भारताचा ध्वज कसा असावा हे ठरविण्यासाठी तातडीने एक समिती नेमली गेली. त्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रभृृती होते. त्यांनी ठरवले की कॉंग्रेसचा ध्वज हाच स्वतंंत्र भारताचा ध्वज म्हणून घोषित करावा, फक्त चरख्याऐवजी अशोकचक्र हे चिन्ह ध्वजाच्या मध्यभागी विराजमान व्हावे. त्या संबंधीचा ठराव जवाहरलाल नेहरू यांनी मांडला. घटना समितीने २२ जुलैला या ठरावाला मंजुरी दिली.
” हा एक ऐतिहासिक क्षण ” भारताची मिशन चांद्रयान-२ मोहीम
२०१९ : जगभरातील सर्वच भारतीयांसाठी अभिमानास्पद असलेल्या आणि अवघ्या जगाचं लक्ष लागलेल्या ‘चांद्रयान-२’ अंतराळात झेपावलं. इस्रोच्या श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रावरून दुपारी २ वाजून ४३ मिनिटांनी ‘चांद्रयान-२’ चे प्रक्षेपण करण्यात आले. यान यशस्वीपणे अवकाशात झेपावल्यानंतर शास्त्रज्ञांनी आणि देशवासियांनी एकच जल्लोष केला.
• मृत्यू :
१९१८ : पहिल्या महायुद्धातील भारतीय पायलट इंदरलाल रॉय यांचे निधन ( जन्म : २ डिसेंबर १८९८ )
१९८४ : प्रकाशक व साहित्यिक गजानन लक्ष्मण तथा ग. ल. ठोकळ यांचे निधन. ( जन्म : २६ मे १९०९ )
- जन्म :
१८९८ : पद्म भूषण पुरस्कार सन्मानित शास्त्रीय गायक पं विनायकराव पटवर्धन यांचा जन्म ( मृत्यू : २३ ऑगस्ट , १९७५ )
१९२५ : लेखक, पत्रकार, महाराष्ट्र टाइम्सचे संपादक गोविंद तळवलकर यांचा जन्म ( मृत्यू : २१ मार्च, २०१७ )
१९३७ : मध्यमगती गोलंदाज वसंत रांजणे यांचा जन्म ( मृत्यू : २२ डिसेंबर २०११ )
१९७० : महाराष्ट्राचे १८ वे मुख्यमंत्री देवेंद्र गंगाधर फडणवीस यांचा जन्म