‘स्मार्ट कारखान्या’चे ‘स्मार्ट’ नेतृत्व
वाढदिवस विशेष
अनेक पुरस्कार प्राप्त श्री विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे तसेच जुन्नर तालुक्याचे युवा नेतृत्व करणारे, अष्टपैलू व्यक्तिमत्त्व मा. चेअरमन श्री. सत्यशीलदादा शेरकर यांचा १२ जानेवारी रोजी वाढदिवस. यानिमित्त ‘शुगरटुडे’च्या प्रतिनिधीने त्यांच्या व्यक्तिमत्त्वाच्या पैलूंवर लिहिलेला विशेष लेख
महाराष्ट्राचे आराध्य दैवत, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेल्या जुन्नर तालुक्याला लाभलेला हा ऐतिहासिक वारसा.
गड शिवनेरी, शिवप्रभुंचे जन्मस्थान, विघ्नहर्ता ओझर, कुकडी नदीतीरी वसलेले छोटेसे गाव शिरोली. बोरी, बाभळी, ऊस, केळी, तुरीच्या पिकांमध्ये हिरवीगार नटलेली वसुंधरा मनाला मोहिनी घालणारी, मंत्रमुग्ध करणारी…
तिन्ही सांजा सोनेरी नदीकाठ, तसेच येथील बैलगाड्यांची शर्यत जत्रा म्हणजे पशुवैभव संस्कृतीशी नाळ जोडणारीच…
कला-कीर्तन सप्ताहातून संस्कारांची पाळेमुळे जोपासून सहकार तत्त्वावर उभारलेला, औदयोगिक क्रांतीचे, रणशिंग फुंकणारा श्री विघ्नहर सहकारी साखर कारखाना. याचा इतिहास पाहता शेरकर कुंटुंब व त्यातील सदस्यांचे योगदान हे जुन्नर तालुक्याला लाभलेले वरदानच आहे.
“इवलेसे रोप लाविले दारी
त्याचा वेलू गेला गगनावरी||”
या उक्तीप्रमाणे सहकाराची मुहूर्तमेढ रोवणारे, आपणा सगळ्यांचे श्रध्दास्थान असलेले शेठबाबा, माजी खासदार मा. श्री. निवृत्तीशेठ शेरकर यांनी सहकार तत्त्वावर श्री विघ्नहर सहकारी साखर कारखान्याची स्थापना केली. त्याचा वटवृक्ष केला तो श्री. सोपानशेठ शेरकर यांनी आणि महाराष्ट्रातच नव्हे तर दिल्लीच्या तख्तापर्यंत कारखान्याचे नाव पोहचवण्याचे कार्य करणारे, या वटवृक्षाला बहर देणारे असे कारखान्याचे चेअरमन मा. श्री. सत्यशीलदादा शेरकर!
असे हे शेरकर कुटुंब जणू काही जुन्नर तालुक्याला लाभलेली एक संजीवनी, स्व. निवृत्तीशेठ शेरकर यांनी दहा गावांची शिरोली बु. कृषक सेवा सहकारी सोसायटी स्थापन केली व त्या सोसायटीच्या माध्यामातून शेतकऱ्यांच्या आर्थिक गरजा भागविण्यासाठी त्यांनी मध्यम, दीर्घ मुदतीचे कर्ज उपलब्ध करुन दिले.
त्यामुळे शेतकऱ्यांची शेती विषयीची अनेक कामे मार्गी लागली.
शेठ बाबांनंतर स्व. सोपानशेठ शेरकर यांनी सोसायटीचा कारभार अत्यंत चांगल्या पध्दतीने चालविला. अण्णांच्या आकस्मिक निधनानंतर दादांकडे कारखान्याच्या चेअरमन पदाबरोबरच सोसायटीचे अध्यक्षपदही सोपविण्यात आले.
त्यांनी जुन्या व नव्या पिढीचा अत्यंत चांगल्या पध्दतीने समन्वय साधून सोसायटीच्या कामकाजात पारदर्शकता आणली. शेतकऱ्यांच्या शेती विषयक गरजा कमी झाल्यामुळे दादांनी इतर व्यवसायासाठी कर्ज पुरवठा करण्याचे धोरण अवलंबिले. आज मितीला आशिया खंडातील प्रथम क्रमांकाची कृषक सोसायटी म्हणुन शिरोली बु. कृषक सेवा सहकारी संस्थेचा क्रमांक लागतो. त्यामध्ये सत्यशीलदादांचे मोठे योगदान आहे.
दातृत्व, नेतृत्व आणि समाजभान ठेवणारे एक अजोड व्यक्तिमत्त्व… विघ्नहर सहकारी कारखान्याचे विद्यमान चेअरमन अर्थात सर्वांचे लाडके दादा … सत्यशीलदादा ! दादांचा १२ जानेवारी हा जन्मदिवस. जुन्नर तालुका म्हटलं की सत्यशीलदादा शेरकर हेच चित्र डोळ्यांसमोर उभे राहाते.
ते नेहमी सामाजिक, राजकीय कार्यात असले तरी कारखान्याच्या नियमित व्यवस्थापनात सक्रिय असतात. ‘अचूक निर्णय क्षमता’ ही त्यांच्या यशाची गुरुकिल्ली आहे. ते करारी, स्वाभिमानी, ज्ञानी, प्रज्ञावंत, समाजभान ठेवणारे, न्यायप्रिय, प्रामाणिकपणा, चिकित्सक वृत्ती, उद्योगी, गरजूंना मदत करणे हा त्यांचा स्थायी स्वभाव आहे. ते एक उत्तम वक्ता आणि मेहनती, उदयोगशील मराठी माणूस आहेत. त्यांनी श्री शिवछत्रपती कॉलेज, जुन्नर मधून बी.ए.ची पदवी घेतली.
“अंकुरित होण्यासाठी
दाण्याला गाडून घ्यावे लागते
सुगंधित होण्यासाठी
चंदनाला झिजावे लागते.”
याप्रमाणे श्री. सत्यशीलदादा खूप कमी वयात श्री विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन झाले. कारखान्याचे अध्यक्ष श्री सोपानशेठ शेरकर यांच्या आकस्मिक जाण्याने दादांवर दु:खाचा डोंगर कोसळला. अशा अवस्थे मध्ये कोणताही होतकरू तरुण कोसळून पडला असता; हतबल झाला असता. पण अशा बिकट, नाजुक प्रसंगी कार्यकारी संचालक मंडळाने सत्यशीलदादा यांचे नेतृत्व गुण, कौशल्य बघून त्यांच्यावर ऐन तरुण वयातच चेअरमन पदाची जबाबदारी सोपविली.
व्यक्तिगत दु:ख बाजूला ठेवून, सत्यशीलदारांनी कारखान्याचे नेतृत्व स्वीकारले आणि चेअरमन पदाची जबाबदारी यशस्वीपणे पार पाडण्याचा दृढनिश्चय केला.
माझ्यावर ज्या विश्वासाने कारखान्याच्या चेअरमनपदाची धुरा सोपावली आहे. त्या विश्वासाला कोणताही तडा जाऊ नये, अशा आत्मविश्वासाने त्यांनी स्व. शेठबाबा व स्व. अण्णा यांचे कार्य पुढे सुरू ठेवले. या थोर नेत्यांची मी जागा कधीच घेऊन शकत नाही; मात्र त्यांची उणीव भासणार नाही, यासाठी सदैव प्रयत्न करेन, अशी ग्वाही सत्यशीलदादांनी दिली. त्याच विश्वासाने त्यांनी कामकाजाला सुरुवात केली.
तंत्रज्ञान, आधुनिकीकरणावर भर
स्मार्ट ऊसतोडणी ते स्मार्ट कर्मचारी
त्यांनी तंत्रज्ञान व आधुनिकतेवर जास्त भर देऊन कामामध्ये सुरुळीतपणा व पारदर्शकता कशी निर्माण होईल याकडे लक्ष देताना त्यांनी कारखान्याच्या कामकाजामध्ये स्मार्ट शेतकरी कार्ड तयार करुन त्यावरील क्यूआर स्कॅन करुन, ऊस वजनस्लिप व ऊस बिले डाऊनलोड करणेची सुविधा निर्माण केली.
तसेच स्मार्ट ऊस तोडणी / वाहतूकदार कार्ड शेतकी विभागासाठी ऊस नोंदी व ऊस तोडणी प्रोग्रामसाठी मोबाईल ॲप्लीकेशन तयार करण्यात येवून, ऊस तोडणी / वाहतूकदारांना स्मार्ट ऊस तोडणी/वाहतूकदार कार्ड देण्यात आले. त्यामुळे कार्ड स्कॅन केल्यावर ऊस वजन स्लिप तयार होण्यास मदत झाली. तसेच कारखाना कर्मचा-यांसाठी स्मार्ट कर्मचारी ओळखपत्र तयार करणेत आलेले असून, फक्त ओळखपत्र असा उपयोग न करता, त्यावरील डिजिटल क्यू-आर स्कॅन करुन, त्यांना पगार स्लिप, सवलत दराने पेट्रोल वाटप, तसेच सवलतीच्या दरातील साखर वाटप, पगार स्लिप डाऊनलोड करणे इ. सुविधा देण्यात आलेल्या आहेत.
कारखाना व्यवस्थापनाला कारखान्याच्या दैनंदिन गळिताची माहिती तत्काळ उपलब्ध होणेसाठी स्मार्ट संचालक ओळखपत्र कार्ड तयार करण्यात आले. डिजिटल नंबर ट्रॅकिंग सिस्टीममुळे प्रत्येक ऊस वाहतूक वाहनाला आर.एफ.आय.डी टॅग लावण्यात आलेला आहे. केनयार्डमधील ऑटोमॅटिक नंबर ट्रॅकिंग सिस्टीमद्वारे, नंबर आलेल्या वाहनांची माहिती डिजिटल एलईडी स्क्रीनवर उपलब्ध करुन देणेत आलेली आहे. दादांच्या या आधुनिक दृष्टिकोनामुळे कारखान्याचे कामकाज जलदगतीने व बिनचूक होण्यास मदत झाली आहे.
बिनविरोध निवडणुकीचे शिल्पकार
श्री विघ्नहर सहकारी साखर कारखान्याची निवडणूक सन २०१५ मध्ये कारखान्याचे चेअरमन श्री. सत्यशीलदादा शेरकर यांच्या नेतृत्वाखाली बिनविरोध पार पडली. तसेच सन २०१० मध्ये झालेल्या निवडणूकीत दादांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण पॅनेल विजयी झाले.
एकीकडे परंपरा व दुसरीकडे आधुनिकता यांचा सुरेख मेळ तसेच गावगाडा, रुढी, परंपरा, शेती आणि मातीशी ममतेचे नाते जपणारे शेरकर कुटुंब. या कुटुंबाचा वारसा दादांनी अत्यंत समर्थपणे पुढे चालवला आहे.
सत्यशीलदादा कर्तव्यात जसे वज्रासारखे, तसेच स्वभावाने खूप विनम्र आहेत. “आपले ध्येय, आपल्या मर्यादा, पार करण्याचे, त्या अधिकाधिक उंच नेण्याचे असायला हवे, मग ती कामाची व्याप्ती असो, विकास असो, गुणवत्ता असो किंवा काहीही असो. केवळ विकास हे लक्ष्य ठेवू नका, तर अनेक पटीत विकासाचे उद्द्दिष्ट ठेवा. खूप मोठा विचार करा आणि आपली स्वतःची अशी महत्त्वाकांक्षी स्वप्ने, दृष्टी विकसित करा,” हा त्यांचा तरुणांसह सर्वांना संदेश आहे.
पुरस्कार-सन्मानांचे शतक
याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे महाराष्ट्रातील सर्वोत्कृष्ट कारखाना म्हणून ‘श्री विघ्नहर’ला मिळालेले देश व राज्य पातळीवरील शंभरावर पुरस्कार आणि सन्मान.
दादांनी आपल्या कामगारांबरोबर आणि सभासदांबरोबर विश्वास आणि समान ध्येय या पायावर आधारित नातेसंबंध निर्माण केले आहेत. कामाप्रति असलेली निष्ठा आणि रात्रंदिवस वाहून घेण्याच्या वृत्तीमुळे राजकारण आणि समाजकारण यांचा समतोल दादांनी आपल्या व्यक्तिमत्वात साकारला आहे.
शालेय जीवनापासून समाजसेवेची आवड असलेल्या दादांचा, राजकारण समाजभिमुख असावे याकडे कटाक्ष असतो आणि हेदेखील त्यांच्या व्यक्तिमत्वाचे आणखी एक वैशिष्टय आहे. जुन्नर तालुक्याच्या राजकारणात दादांचा सक्रिय सहभाग आजच्या तरुण राजकारणी पिढीला बरेच काही सांगून जाते.
जुन्नर तालुक्याचा सामाजिक, राजकीय इतिहास दादांच्या कार्याचा उल्लेख केल्याशिवाय पूर्ण होणार नाही, यात दुमत असूच शकत नाही. सर्वसामान्य माणसाच्या हितासाठी, त्याच्या सामाजिक न्यायासाठी ते रस्त्यावर आले. सभा, संमेलने, आंदोलने, मोर्चे, निवेदने, असे संघर्षाने काठोकाठ भरलेले दादांचे सामाजिक आयुष्य आहे. या ऊर्जावंत व्यक्तीकडून येणाऱ्या पिढीने काही मागायचे ठरवले तर नक्कीच निस्वार्थीपणा आणि संघर्षभरी समाजदृष्टी मागावी.
कुटंबाचा वारसा समर्थपणे चालवला
श्री. सत्यशीलदादा शेरकर हे केवळ कारखान्याचेच नव्हे तर युवापिढीच्या गळ्यातील ताईत बनले. सतत कार्यमग्न राहणे हा त्यांचा आणखी एक गुण.
हातात घेतलेले कोणतेही काम पूर्ण होईपर्यंत ते शांत बसत नाहीत. व्यायाम, कसरतीची विशेष आवड असल्याने आजार जवळपास फिरकत नाहीत.
त्यांचे पहिले प्राधान्य कर्तव्य आणि नंतर कुटुंब, कार्यमग्नता हे जणू काही त्यांना जडलेले व्यसनच. स्वतः मागे राहून योग्य माणसांकडे त्या विभागाचे नेतृत्व आणि जबाबदारी त्यांनी दिली. या माणसांना समर्थ बनविण्याच्या कार्यपद्धतीमुळे एका प्रकल्पातील यशाचे रूपांतर अनेक ठिकाणी होत राहते आणि यशाचा सुगंध सर्वत्र फैलावतो. याचे उत्तम उदाहरण म्हणजे कारखान्याचे केलेले आधुनिकीकरण आणि इथेनॉल प्रकल्प.
“अढळ विश्वास असेल तर
जगात अशक्य काहीच नाही
भरारीची जिद्द असेल तर
आकाशही फार दूर नाही”
अशक्य किंवा नाही हे शब्द त्यांच्याकडे नाहीतच. सकारात्मक विचार करून हाती घेतलेले काम पूर्ण झालेच पाहिजे, असा ध्यास उराशी बाळगून कारखान्याचा विकास, शेतकऱ्यांचा विकास, जुन्नर तालुक्याचा विकास, तरुणाईचा विकास हीच माझी सर्वोच्च जबाबदारी आहे. या भावनेतून ते कामामध्ये दिवस-रात्र मेहनत करतात. हे सर्व करत असताना ते वडीलधारी मंडळी व जेष्ठांचा सदैव सन्मान करतात.
परिस्थिती कोणतीही असो सभासद वर्ग आणि शेतकरी यांची दिवाळी तसेच कामगारांना बोनस दिल्याशिवाय माझी दिवाळी गोड होणार नाही यासाठी ते आग्रही असतात. आपला कारखाना ही लाखों जणांची जननी आहे. माता आहे आणि त्या मातेची आपण सर्वतोपरी काळजी घेतली पाहिजे, या मातेच्या अस्तित्वासाठी आपण झगडले पाहिजे, जेणेकरून त्या जननीच्या माध्यमातून हजारो कुटुंबे आनंदी आयुष्य जगतील, असा त्यांचा दृष्टिकोन असतो.
सामाजिक कार्यक्षेत्रातही त्यांचा मोलाचा वाटा आहे. सामाजिक बांधिलकी जपणारे हे एक अजोड व्यक्तिमत्त्व. त्याचे एक उत्तम उदाहरण म्हणजे कोरोनासारख्या महामारीत् त्यांनी दाखविलेले आपले योगदान, समर्पण. आपण समाजाचे ऋणी आहोत. या तत्त्वावर त्यांनी महामारीच्या काळात कारखान्यातील कर्मचारी, ऊसतोडी कामगार यांच्या आरोग्याची सर्वतोपरी काळजी घेतली. आणि आपली नैतिक जबाबदारी पार पाडली.
शेरकर कुटुंबाची परंपरा, समाजातील त्यांचा नावलैाकिक तसेच शेरकर कुटुंबाकडून सभासद वर्गांच्या असलेल्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी दादांनी तिशीतच वाटचाल सुरु केली. ते कारखान्याचे चेअरमन झाले. त्यांचे वडील स्व. सोपानशेठ शेरकर हयात नसताना त्यांच्यात असलेला नेतृत्वाचा गुण कार्यकारी संचालक मंडळाने एकमताने मान्य केला आणि श्री. सत्यशीलदादा शेरकर यांनी जेष्ठ, वडिलधाऱ्यांसोबत काम करताना त्यांचा आदर त्यांची प्रतिष्ठा व कोठेही ते अवमानित होणार नाही, याची कटाक्षाने खबरदारी घेतली. चेअरमन पदावर कार्यरत असताना ते अत्यंत पारदर्शकपणे कामकाज करत आहेत. हे कामकाज पाहताना त्यांनी कारखान्याचा कर्मचारी वर्ग व सभासद तसेच विघ्नहर सहकारी साखर कारखान्याच्या कुटुंबातील अनेक जेष्ठ संचालक मंडळ व तरुण संचालक मंडळ आपल्या सोबत घेतले आहे.
आता कुठे सुरुवात आहे.
अजून खूप करायचे आहे
जीवनातल्या प्रत्येक क्षणाचे
सोने करायचे आहे.
अशी प्रेरणा त्यांनी युवापिढीला दिली. श्री. सत्यशीलदादा शेरकर हे गेली १२ वर्षे तालुक्यामध्ये राजकारण व समाजकारणाच्या माध्यमातून काम करत असून युवकांचे संघटन करून, जेष्ठांना बरोबर घेऊन शेतकरी विकासाची ध्येय, धोरणे व विचार तालुक्यातील शेवटच्या माणसांपर्यंत पोहोचविण्याचे काम करत आहेत.
त्यांच्या नेतृत्वाखाली जुन्नर तालुक्यातील ग्रामपंचायत, नगरपरिषद, पंचायत समिती, जिल्हा परिषद, कृषि उत्पन्न बाजार समिती, श्री विघ्नहर सहकारी साखर कारखाना इ० संस्थांच्या निवडणूका पार पाडल्या. जुन्नर तालुक्यात सत्यशीलदादांची लोकप्रियता सर्वसामान्य नागरिक, तरुण वर्ग, जेष्ठ मंडळीमध्ये वाढत आहे हेच या निवडणुकांतून दिसून आले.
आजच्या श्री विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे वैभव पाहता दादांनी जे निर्णय घेतले त्याचाच हा परिपाक आहे. सक्षमपणे पदावर आल्यानंतर दादांचे नेतृत्व कोणत्याही क्षेत्रामध्ये कुशलपणे काम करु शकते याची शाश्वती संपूर्ण कार्यक्षेत्रातील लोकांना आहे. भावी तरुणपिढी दादांकडे ‘आदर्शनेता’ म्हणून पाहत आहे. जाणकार व वडीलधारी मंडळी आपल्या सर्वांगीण विकासाठी त्यांना आशीर्वाद देण्यासाठी सदैव तत्पर आहेत.
कुटुंबवत्सल दादा
व्यक्तिगत आयुष्यात सत्यशीलदादा हे खूप कुटुंबवत्सल आहेत. संपूर्ण परिवाराचे समाजासाठी मोठे योगदान आहे. आपणा सर्वांचे श्रद्धास्थान शेठबाबा व आपले आदरणीय श्री. सोपानशेठ शेरकर यांनी दिलेल्या संस्कारांचा, सामाजिकतेचा वारसा चेअरमन सत्यशीलदादा हे कुशल पद्धतीने पुढे चालवत आहेत.
सरकारी नोकऱ्या धूसर होत असताना सत्यशीलदादा आपल्या अनुभवातून युवकांना उद्योग-व्यापार करण्याचा जो मूलमंत्र देतात…. तो आजच्या पिढीला फार महत्त्वाचा आहे. अनुभव, सच्चाई आणि साधेपणा यांचा सुरेख संगम दादांच्या व्यक्तिमत्त्वात आहे. त्यांचे मार्गदर्शन तरुण पिढीला दीपस्तंभासारखेच आहे.
ते आपल्या मार्गदर्शनात सांगतात की, लोक ढासळलेल्या घराच्या विटासुध्दा सोडत नाहीत. त्यामुळे खचून जाऊ नका. नफातोट्याचा हिशेब लगेच करु नका. कष्ट तर असरणाच. काम करावं लागणारच. पण त्याचा परतावादेखील तेवढा मोठा असतो. लोकांच्या टीका-टिपण्णीकडे दुर्लक्ष करा.
टीका करणारे तुमच्या पाठीमागे असतात. तुमच्या सोबत असणाऱ्यांना महत्त्व दया. नोकरी मागणा-यांपेक्षा नोकरी देणारे व्हा. उद्योजक व्हा, समृद्ध व्हा, आणि आपला गाव, परिसर, तालुका आणि पर्यायाने देशालाही समृद्ध करा. या विचारांनी आपल्या ध्येयाकडे वाटचाल करणारा कोणताही मराठी तरुण यशस्वी उद्योजक म्हणून नावारूपाला आल्याशिवाय राहणार नाही.
त्यामुळे तरुणाईच्या गळ्यातील ताईत बनलेले, त्यांचा आयडॉल म्हणून सत्यशीलदादा हे पुढे आले आहे. त्यांच्या या कार्यामुळे, नम्र स्वभावामुळे व पारदर्शक कामकाजामुळे लक्षावधी जेष्ठांचे आशिर्वाद त्यांना लाभलेले आहेत.
जुन्नर तालुक्याचे आशास्थान म्हणून सत्यशीलदादा यांचे नेतृत्व बहरत आहे. त्यांना भविष्यात नक्कीच आणखी मोठी झेप घेण्याची संधी मिळणार आहे. त्यांना वाढदिवसानिमित्त, तसेच पुढील आश्वासक वाटचालीस खूप खूप शुभेच्छा!