राजकारण बाजूला ठेवून जपली माणुसकी! ऊसतोड कामगारांना सभापतींचा आधार

पुणे/खेड: राजकारणात केवळ मतांचे गणित न पाहता माणुसकीला प्राधान्य देत खेड कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती विजयसिंह शिंदे पाटील यांनी एका ऊसतोड मजूर कुटुंबाला मदतीचा हात दिला आहे. खेड तालुक्यातील मरकळ येथे बिबट्याच्या हल्ल्यात दोन बैल गमावलेल्या परजिल्ह्यातील मजुरांना शिंदे पाटील यांनी आर्थिक मदत करून दिलासा दिला.
जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव येथील १४ ऊसतोड मजूर कुटुंबे सध्या मरकळ (ता. खेड) परिसरात वास्तव्यास आहेत. गुरुवार, १ जानेवारी २०२६ रोजी पहाटेच्या सुमारास या मजुरांच्या वस्तीवर बिबट्याने अचानक हल्ला केला. या भीषण हल्ल्यात मजुरांच्या दोन बैलांचा जागीच मृत्यू झाला. उदरनिर्वाहाचे साधन हिरावले गेल्याने हे मजूर कुटुंब हवालदिल झाले होते.
ही घटना समजताच सभापती विजयसिंह शिंदे पाटील यांनी आपल्या व्यस्त कार्यक्रमातून वेळ काढून थेट घटनास्थळ गाठले. बिबट्याच्या हल्ल्याची पाहणी करून त्यांनी भयभीत झालेल्या कामगारांना धीर दिला. महत्त्वाचे म्हणजे, हे मजूर स्थानिक मतदार नसतानाही केवळ माणुसकीच्या नात्याने त्यांनी समर्थ फाउंडेशनच्या माध्यमातून तात्काळ आर्थिक मदत सुपूर्द केली.
सर्वत्र कौतुक
सध्या बाजार समितीचे कामकाज, कांदा लिलाव उद्घाटन आणि आगामी जिल्हा परिषद निवडणुकीचा प्रचार अशा विविध आघाड्यांवर शिंदे पाटील सक्रिय आहेत. असे असतानाही त्यांनी परप्रांतीय आणि परजिल्ह्यातील मजुरांच्या दुःखाची दखल घेतल्याने मरकळ आणि राजगुरुनगर परिसरात त्यांच्या संवेदनशीलतेचे मोठे कौतुक होत आहे. “मतांच्या राजकारणापेक्षा माणुसकी मोठी,” असा संदेश या कृतीतून विजयसिंह शिंदे पाटील यांनी दिला असल्याची भावना स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली आहे.






