‘डीएसटीए’कडे सर्व तांत्रिक सुविधा : भड
पुणे : १९३६ साली स्थापन झालेल्या दी डेक्कन शुगर टेक्नॉलॉजिस्ट्स असोसिएशन इंडियाने (डीएसटीए) साखर उद्योगा क्षेत्रासाठी भरीव योगदान दिले आहे. आज संस्थेकडे सर्व प्रकारच्या तांत्रिक सुविधा आहेत, त्याचा लाभ साखर उद्योगाला मिळत्र आहे, असे प्रतिपादन ‘डीएसटीए’चे अध्यक्ष आणि प्रसिद्ध उद्योगपती श्री. शहाजीराव भड यांनी केले.
संस्थेचे ६९ वे वार्षिक अधिवशेन आणि शुगर एक्स्पोच्या उद्घाटन सोहळ्याचे प्रास्ताविक करताना ते बोलत होते. संस्थेच्या आजवरच्या वाटचालीचा त्यांनी थोडक्यात आढावा घेताना, व्यासपीठावरील प्रमुख मान्यवरांचा खास शैलीत परिचय करून दिला.
प्रख्यात उद्योगपती आणि साखर उद्योगातील दूरदर्शी नेतृत्व दिवंगत लालचंद हिराचंद यांनी १९३६ साली या संस्थेची स्थापना केली. तेव्हापासून आमची संस्था नव्या तंत्रज्ञानाला आत्मसात करत यशस्वी वाटचाल करत आहे, असे सांगताना ‘साखर उद्योगाला तांत्रिक मार्गदर्शन करणाऱ्या सुमारे तीन हजार तंत्रज्ञाचे सक्रिय संघटन म्हणजे आमची डीएसटीए ही संस्था, असे गौरवोद्गार श्री. भड यांनी काढले.
संस्था प्रत्यक्ष कारखाना स्थळावर जाऊन, साखर उद्योगाच्या तांत्रिक समस्या सोडवण्यास मदत करते. आमची स्वत:ची सुसज्ज लॅब आहे, सर्व प्रकारच्या टेस्टिंग सुविधा आमच्याकडे आहेत. अलीकडेच एन्झाइम कीट तयार केले असून, त्याद्वारे चाचण्या होतात. संस्थेची अद्ययावत लायब्ररीदेखील आहे. गेल्या वर्षीपासून आम्ही दर महिन्याला एक ज्वलंत विषय घेऊन सेमिनार आयोजन करतो, अशी माहिती भड यांनी दिली.
उद्घाटन सोहळ्याला महसूलमंत्री विखे पाटील यांची ऑनलाइन उपस्थिती होती. यावेळी व्यासपीठावर राष्ट्रीय साखर महासंघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील, एमडी प्रकाश नाईकनवरे, माजी मंत्री आणि ‘मांजरा साखर’ परिवाराचे प्रमुख दिलीपराव देशमुख, व्हीएसआयचे महासंचालक संभाजी कडू पाटील, साखर आयुक्त डॉ. कुणाल खेमनार, आमदार अरूणअण्णा लाड, व्हीएनपी समूहाचे संचालक विवेक हेब्बल, एसटीएआयचे अध्यक्ष संजय अवस्थी, डीएसटीएचे उपाध्यक्ष (महाराष्ट्र) सोहन शिरगावकर, उपाध्यक्ष (तांत्रिक) एस. डी. बोखारे, कार्यकारी सचिव गौरी पवार इ. उपस्थित होते.