साखरेची एमएसपी 3720 रुपये करण्याची केंद्राकडे मागणी : वळसे – पाटील
पुणे – साखरेची किमान आधारभूत किंमत (एमएसपी) प्रतिक्विंटल ३७२० रुपये करा, अशी मागणी केंद्र सरकारकडे केली असल्याचे सहकारमंत्री दिलीपराव वळसे पाटील यांनी सांगितले. केंद्र सरकारच्या धर्तीवर राज्याच्या सहकार कायद्यात बदल करण्यासाठी चर्चा सुरू आहे, अशी माहितीही त्यांनी दिली.
राष्ट्रीय सहकारी साखर महासंघाच्या वतीने वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत एका चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी साखर महासंघाचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर, माजी मंत्री जयंत पाटील, राजेश टोपे, नरेंद्र मुरकुंबी, प्रकाश नाईकनवरे, बी, बी, ठोंबरे आदी व्यासपीठावर उपस्थित होते.
वळसे पाटील म्हणाले, ‘राज्यातील गेल्या वर्षीच्या ऊस गळीत हंगामाची स्थितीही बिकट होती. यामुळे मागील साखर हंगामाच्या तुलनेत २६६ लाख मेट्रिक टनाने गाळप कमी झाले आहे. परिणामी ३२ लाख टनांनी साखर उत्पादन कमी झाले आहे.
गेल्या वर्षी जून व जुलै या दोन महिन्यात पावसाने दिलेली ओढ व ऐन हंगाम सुरु होत असताना आक्टोबर व नोव्हेंबर या दोन महिन्यात झालेला प्रचंड अवकाळी पाऊस याचा साखर उद्योगावर विपरीत परिणाम झाला. यामुळे राज्यातील उसाची उत्पादकता प्रति हेक्टर ७७.८० टनाने कमी होऊन, साखरेच्या उताऱ्यातसुद्धा ०.४२ टक्क्यांनी घट झाल्याचे दिसून आले.’
यंदाच्या पावसाळ्यात उसाचे क्षेत्र असलेल्या भागात आतापर्यंत खूप कमी पाऊस झाला आहे. यामुळे ऊस उत्पादन कमी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. परिणामी आगामी ऊस गळीत हंगामाची परिस्थिती बिकट होण्याची शक्यताही त्यांनी वर्तविली.
पवारांनीच राजीनामा रोखला
राष्ट्रवादी कॉंग्रेसमधून बाहेर पडत महायुतीच्या सरकारमध्ये सहभागी झाल्यानंतर मी वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या उपाध्यक्षपदाचा राजीनामा देणार होतो. तशी तयारी केली होती. परंतु शरद पवार यांनीच या राजीनामा देण्यापासून परावृत्त केले, असा गौप्यस्फोटही वळसे यांनी केला. .
सहकारमंत्री वळसे पाटील राष्ट्रवादी कॉंग्रेसमधून बाहेर पडल्यानंतर आज पहिल्यांदाच या कार्यक्रमाच्या निमित्ताने शरद पवार आणि दिलीप वळसे पाटील एका व्यासपीठावर आले होते. मात्र एका व्यासपीठावर येऊनही, या दोघांमध्ये पूर्वीप्रमाणे मनमोकळा संवाद झाला नाही. पवार आणि जयंत पाटील हे मधूनच कार्यक्रमातून निघून गेले.
त्यामुळे वसंतदादा इन्स्टिट्यूटच्या आजच्या या कार्यक्रमात वळसे पाटील यांचेच एकमेव भाषण झाले. दरम्यान, पत्रकारांनी शरद पवार आणि जयंत पाटील यांना बोलण्याची विनंती केली. मात्र जयंत पाटील यांनी वळसे पाटील तुमच्याशी बोलतील असे मिश्कीलपणे सांगितले. उपमुख्यमंत्री अजित पवार या कार्यक्रमाला येणार होते. परंतु त्यांची अनुपस्थिति ठळकपणे जाणवली.