‘शरयू ॲग्रो’ची फसवणूक: चिफ इंजिनिअर, राजकीय नेत्यावर गुन्हा

आवडल्यास ही बातमी शेअर करा

अहिल्यादेवी नगर : सातारा जिल्ह्यातील शरयू ॲग्रो इंडस्ट्रीज संचालित साखर कारखान्याची फसवणूक केल्याच्या आरोपावरून वसंत लोढा यांना सातारा पोलिसांनी नगर जिल्ह्यातून अटक केली, अशी माहिती पोलिसांनी दिली.

शरयु अँग्रो इंडस्ट्रीज लि. या साखर कारखान्याची जवळपास एक कोटी चौदा लाख रुपयांची फसवणूक झालेली असून, यात लोढा यांच्यासह एक ठेकेदार तसेच शरयू इंडस्ट्रीज लि. चे तीन इंजिनिअर सहभागी असल्याच्या तक्रारीवरून लोणंद पोलिसांत एकूण पाच जणांवर गुन्हा दाखल झालेला आहे. लोढा हे भाजपचे स्थानिक नेते आहेत.
लोढा यांच्याखेरीज प्रसाद अण्णा (रा. सांगली), शरयू इंडस्ट्रिजमधील संतोष पोपट होले (सिनिअर इंजिनिअर, रा. जाधववाडी, ता. फलटण, जि. सातारा. महादेव अनंत भंडारे ( चिफ इंजिनिअर, रा. कराड, जि. सातारा), संजय अनिरुद्ध मुळे सिनियर इंजिनिअर, रा. उंबरे, ता. पांढरे) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.

कारखान्यातील अधिकाऱ्यांना हाताशी धरून ही फसवणूक करण्यात आली आहे. या प्रकरणी शरयू कारखान्याचे अविनाश शिवाजी भापकर (रा. आसू, ता. फलटण, जि. सातारा) यांनी फिर्याद दिली आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बंधू श्रीनिवास पवार यांच्या कापशी ( ता. फलटण, जि. सातारा) येथील शरयू अॅग्रो इंडस्ट्रीज लि. या साखर कारखान्याच्या देखभाल दुरुस्तीचे काम लोढा यांच्या मालकीची फेब्रिक्स इंडस्ट्रिज ( लोढा निवास, आनंदीबाजार, अहमदनगर) व प्रसाद अण्णा याच्या अॅक्युरेट इंजिनिअरिंग अॅण्ड इरेक्शन ( सांगली शाखा) कंपनीला मिळाले होते.

त्यांनी नवीन काम न करता पूर्वीच्याच मशिनरी, पॅनल, बॉक्स, पाईप आदी साहित्य नवीन टाकल्याचा बनाव करून कारखान्याची १ कोटी १४ लाख ९० हजार ५३८ रुपयांची फसवणूक केली आहे, असे फिर्यादीत म्हटले आहे.

सातारा पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल झाल्यानंतर काही दिवसांपूर्वी चौकशी करण्यासाठी पोलीस अहमदनगरमध्ये आले होते व त्यांनी लोढा यांची चौकशीही केली होती. त्यानंतर गुरुवारी पहाटे लोढा यांना त्यांच्या दूरगाव येथील नातेवाईकांच्या घरातून पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Select Language »