महाराष्ट्राला जगाचे नेतृत्व करण्याची संधी : गायकवाड
![DSTA Pune Felicitation](https://i0.wp.com/sugartoday.in/wp-content/uploads/2023/06/dsta-shekhar5-copy2.jpg?fit=768%2C474&ssl=1)
‘डीएसटीए’ला मोठी भूमिका बजवावी लागणार
पुणे : साखर उद्योग क्षेत्रात जगाचे नेतृत्व करण्याची संधी महाराष्ट्राला मिळू शकते आणि या प्रक्रियेमध्ये डेक्कन शुगर टेक्नॉलॉजिस्ट्स असोसिएशनला (डीएसटीए) महत्त्वाची भूमिका बजवावी लागणार आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ निवृत्त सनदी अधिकारी आणि राज्याचे माजी साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी केले.
श्री. गायकवाड ३१ मे रोजी सेवानिवृत्त झाले. त्यांनी सेवाकाळात, विशेषत: साखर आयुक्त असताना दिलेल्या योगदानाबद्दल, डीएसटीएच्या वतीने त्यांचा ३ जून रोजी हृद्य सत्कार करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर डीएसटीएचे अध्यक्ष शहाजीराव भड, उपाध्यक्ष सोहन शिरगावकर, एस. डी. बोखारे आणि राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे व्यवस्थापकीय संचालक प्रकाश नाईकनवरे यांची उपस्थिती होती.
शिरगावकर यांनी गायकवाड यांचा परिचय करून देताना, त्यांच्या कारकीर्दीचा संक्षिप्त आढावा घेतला.
सत्काराला उत्तर देताना गायकवाड म्हणाले, ‘माझ्या साखर आयुक्त पदाच्या कारकीर्दीत महाराष्ट्राच्या साखर उद्योगाला नव्या उंचीवर नेऊन ठेवल्याचा आनंद आहे. या क्षेत्राच्या विकासासाठी अमर्यादा संधी आहेत. ती क्षमता महाराष्ट्रामध्ये आहे. म्हणून मला वाटते की जगाचे नेतृत्व करण्याची संधी महाराष्ट्राला मिळणार आहे. सध्या साखर उद्योगाची महाराष्ट्राची उलाढाल १ लाख ८ हजार कोटींवर गेली आहे, साखर क्षेत्र आणि डीएसटीएसारख्या संस्थांनी प्रयत्न केल्यास ती अडीच लाख कोटींवर जाऊ शकते.’
तिकडे बिहार, ओरिसात एखादा इथेनॉल प्रकल्प झाली की त्याचे कौतुक होते. आपण महाराष्ट्रात गेल्या तीन वर्षांत १६० वर इथेनॉल प्रक़ल्पांना मान्यता दिली आणि त्यातील बहुतेक प्रकल्पांचे काम सुरू झाले आहेत’, असे गायकवाड यांनी अभिमानाने नमूद केले.
गायकवाड यांच्या कार्यशैलीच्या अनेक आठवणी : नाईकनवरे
शेखर गायकवाड आणि मी एकाच कॉलेजात शिकलो, त्यामुळे आमचे वेगळे नाते आहे. त्यांच्या कार्यशैलीच्या अनेक चांगल्या आठवणी आहेत, असे सांगताना प्रकाश नाईकनवरे यांनी एका प्रसंगाची आठवण करून दिली.
ते म्हणाले, केंद्रातील सहकार सचिवांनी बोलावलेल्या एका बैठकीला गायकवाडदेखील निमंत्रित होते. त्यांनी आपल्या सादरीकरणामध्ये केवळ महाराष्ट्राचीच मांडणी केली नाही तर संपूर्ण देशाची साखर क्षेत्राची दिशा काय असावी याबाबत दहा कलमी योजनाच सांगितली. त्यातील तीन मुद्यांची अंमलबजावणी झाली आहे.’’
संस्थेचे उपाध्यक्ष (तांत्रिक) एस. डी. बोखारे यांनी आभार व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कार्यकारी सचिव गौरी पवार यांनी केले.
श्री. शेखर गायकवाड यांचे सविस्तर भाषण खालील ऑडिओ क्लिपमध्ये