‘काटामारी’वरून साखर आयुक्तांच्या कारखान्यांना कानपिचक्या
पुणे : येथे नुकत्याच झालेल्या एका कार्यक्रमात साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी कारखान्यांच्या ‘काटामारी’चा विषय काढून, कारखान्यांना कानपिचक्या दिल्या.
साखर उद्योगाचे प्रतिनिधी व हरित ऊर्जा क्षेत्रातील तंत्रज्ञांची ‘ग्रीन एनर्जी बिझनेस मिट’ पुण्यात शुक्रवारी पार पडली. त्याचे उद्घाटन साखर आयुक्त गायकवाड यांच्या हस्ते झाले, त्यावेळी ते बोलत होते..
साखर आयुक्त म्हणाले, “साखर उत्पादनात जगात तिसऱ्या क्रमांकावर आपण पोहोचलो आहोत. मात्र, आता साखरेच्या पुढील टप्प्यांकडे जायला हवे. सहकारी कारखाने आता अधिक व्यावसायिक व्हायला पाहिजेत. त्यांनी यापुढे ‘बिझनेस’ची भाषा बोलायला हवी. त्यासाठी व्यवस्थापनात बदल, तंत्रज्ञानाचा स्वीकार, बाजारपेठांचा शोध आणि खासगी उद्योगांना शेजारी आणून त्यांच्याशी करार करीत उपपदार्थ उद्योगात गेले पाहिजे.’’
‘‘साखर उद्योगाने आता आपली प्रतिमा सुधारण्याची अत्यंत गरज आहे, असे सल्ला देऊन गायकवाड म्हणाले, ‘वजन काट्याबाबत शेतकऱ्यांच्यात मनात कसलीही शंका राहता कामा नये. काटामारी करणारे साखर कारखाने कोणते, याबाबत राज्यभरातून मत आजमावल्यास सर्वच कारखान्यांच्या नावांसमोर फुली येईल. त्यामुळे कामकाजात पारदर्शकता आणावी. ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या विरोधात केसेस करणाऱ्या साखर कारखान्यांनी, त्या मागे घ्याव्यात. शेतकऱ्यांबाबत आपण कशासाठी अशी विरोधाची भूमिका घेतो आहोत, याचा विचार करावा.’