त्या कारखान्यांकडे ऊस न टाकण्याचे शेट्टींचे आवाहन

सोलापूर : या हंगामात उसाची कमतरता जाणवणार असून फक्त १० फेब्रुवारीपर्यंतच कारखाने सुरू राहतील. त्यामुळे ज्या कारखान्यांनी दर जाहीर केलेला नाही, त्या कारखान्यांकडे ऊस टाकू नये, असे आवाहन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक व माजी खासदार राजू शेट्टी यांनी शेतकऱ्यांना केले. जिल्ह्यातील बहुतांश साखर कारखान्यांनी अद्याप ऊस दर जाहीर नाही. किमान ३४०० रुपये दर जाहीर करावा. येत्या दोन दिवसांत ऊस दर जाहीर न करणाऱ्या साखर कारखान्यांचे गाळप बंद पाडू, असा इशाराही राजू शेट्टी यांनी दिला. सोलापुरात नुकत्याच आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
राजू शेट्टी म्हणाले, या हंगामात उसाची कमतरता जाणवणार असून फक्त १० फेब्रुवारीपर्यंतच कारखाने सुरू राहतील. त्यामुळे ज्या कारखान्यांनी दर जाहीर केलेला नाही, त्या कारखान्यांकडे ऊस टाकू नये, असे आवाहन करत त्यांनी साखर कारखान्यांकडून उसाचा दर जाहीर न करण्याबरोबरच मोठ्या प्रमाणात काटेमारी आणि रिकव्हरी चोरी होत असल्याचा आरोप केला.
एफआरपी देणे बंधनकारक असतानाही अनेक कारखान्यांची थकबाकी प्रलंबित आहे. ऊस बिल न देणाऱ्या कारखान्यांवर आरआरसीची कारवाई प्रस्तावित असताना जिल्हाधिकारी व तहसीलदार हे राजकीय दबावापोटी कारखान्यांचा लिलाव करत नाहीत, अशी टीका शेट्टी यांनी केली. कोणत्याही दबावाला बळी न पडता कारखान्यांची मालमत्ता जप्त करून तिची विक्री करून शेतकऱ्यांना एफआरपी व्याजासह देण्यात यावी, अशी मागणी त्यांनी यावेळी केली. शेतकऱ्यांकडे जीएसटी नंबर नसल्याने त्यांना जीएसटीचा परतावा मिळत नाही. बाजारातून खते व अवजारे घेताना पूर्ण जीएसटी शेतकऱ्यांनाच भरावा लागतो. खत उत्पादक कंपन्यांना मिळणाऱ्या अनुदानातील कपातीमुळे खत दर वाढले असून त्याचा थेट फटका शेतकऱ्यांना बसत असल्याचेही शेट्टी यांनी सांगितले.






