शिरपूर साखर कारखाना सुरू होणार
भाडेतत्त्वावर देण्याची प्रक्रिया पूर्ण
शिरपूर : गेल्या काही वर्षांपासून बंद असलेला शिरपूर शेतकरी सहकारी साखर कारखाना लवकरच पुन्हा सुरू होणार आहे. यासाठी कारखान्याच्या संचालक मंडळाने हा कारखाना ई- निविदा प्रक्रियेनुसार माँ-रेवा शुगर्स प्रा.लि. बैतूल मध्य प्रदेश या कंपनीला भाडेतत्त्वावर देण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत अक्षय तृतीयेला भाडेतत्त्वावर देण्याची प्रक्रिया पार पडणार आहे.
कारखाना भाडेतत्त्वावर देण्यासाठी संचालक मंडळामध्ये चर्चा होऊन, १० सप्टेंबर, २०२२ रोजी सर्व कारखाना सभासदांची विशेष सर्वसाधारण सभा घेण्यात आली होती व त्यानुसार सर्व सदस्यांनी बहुमताने भाडेतत्त्वावर कारखाना देण्यासाठी संमती दिली होती.
तद्नंतर निविदा तयार करणे, जाहिरात प्रसिद्ध करणे व प्रत्यक्ष कामकाज सुरू झाले. ई-ऑक्शन (ई- निविदा) द्वारे ऑनलाइन निविदा प्रसिद्ध करण्यात आली. ऑनलाइन ई- ऑक्शन (ई-निविदा) प्रक्रियेनुसार माँ-रेवा शुगर्स प्रा.लि. बैतूल मध्य प्रदेश यांची निविदा सर्वोच्च दराची असल्याने त्यांना २० वर्षांसाठी सदरचा कारखाना भाडेतत्त्वाने देण्याचे निश्चित करण्यात आले आहे.
अक्षय तृतीयेच्या शुभमहूर्तावर सायंकाळी ५ वाजता हा कारखाना पुढील वर्षाचा म्हणजेच सन २०२४-२५ च्या ऊस गळीत हंगामासाठी २० वर्षे कालावधी साठी भाडेतत्त्वावर देणयात येणार असल्याची माहिती आमदार अमरिशभाई पटेल, जिल्हा बैंक अध्यक्ष तथा माजी आमदार राजवर्धन कदमबांडे, तसेच साखर कारखाना अध्यक्ष माधवराव पाटील व उपाध्यक्ष दिलीपभाई पटेल यांनी दिली.