श्री अंबालिका शुगर राज्यात सर्वोत्कृष्ट


व्हीएसआयचे पुरस्कार जाहीर : नॅचरल शुगरला सर्वाधिक पुरस्कार
पुणे : उपमुख्यमंत्री अजितदादा पवार मार्गदर्शक असलेल्या, अहिल्यानगर जिल्ह्यातील श्री अंबालिका शुगर प्रा. लि. हा साखर कारखान्याला ‘व्हीएसआय’ने गत हंगामातील सर्वोत्तम कामगिरी करणारा साखर कारखाना म्हणून कै. वसंतदादा पाटील सर्वोत्कृष्ट साखर कारखाना पुरस्कार जाहीर केला आहे. दादांच्या नेतृत्वाखालील साखर कारखान्यांनी सर्वाधिक पुरस्कार पटकावले असून, नॅचरल शुगर अँड अलाईड इंडस्ट्रीज लि.ने सर्वाधिक पुरस्कारांचा मान पटकावला आहे.
सर्वोत्कृष्ट कार्यकारी संचालक पुरस्काराचा बहुमान जगन्नाथ घुगरकर यांना मिळाला आहे.

पुण्यातील (मांजरी) वसंतदादा शुगर इन्स्टिटयूटने (व्हीएसआय) २०२३-२०२४ हंगामासाठीचे वार्षिक पुरस्कार मंगळवारी जाहीर केले. या संस्थेच्या वतीने दिल्या जाणाऱ्या एकंदरित उत्कृष्ट कामगिरीच्या पुरस्कारावर अंबालिका’ने नाव कोरले. २ लाख ५१ हजार रुपये, प्रशस्तिपत्र आणि मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे.
या साखर कारखान्याने मागच्या हंगामात १४ लाख २६ हजार मे. टन ऊस गाळप केला असून, ११.५२ एवढा सरासरी साखर उतारा आहे. तसेच प्रति क्विंटल साखर उत्पादन खर्च ४२५ रुपये आहे. राज्याचे हे प्रमाण सरासरी रू. ५४२ एवढे आहे, असे व्हीएसआयने प्रसिद्धीस दिलेल्या माहितीत म्हटले आहे.
‘नॅचरल’, ‘सोमेश्वर’ची पुरस्कारांवर मोहर
‘विस्मा’चे अध्यक्ष बी. बी. ठोंबरे यांच्या नेतृत्वाखाली नॅचरल शुगर अँड अलाइड इंडस्ट्रीज लि. आणि सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याने प्रत्येकी तीन पुरस्कार मिळवले आहेत. त्यातही मानाचे पुरस्कार नॅचरलला मिळाले आहेत.

नॅचरलला राज्यस्तरीय कै. रावसाहेबदादा पवार सर्वोत्कृष्ट आसवणी पुरस्कार, उत्कृष्ट आर्थिक व्यवस्थापन पुरस्कार (उत्तरपूर्व विभाग), उत्कृष्ट तांत्रिक कार्यक्षमता प्रथम पुरस्कार (उत्तर पूर्व विभाग) असे पुरस्कार जाहीर झाले आहेत, तर ‘सोमेश्वर’ला तांत्रिक कार्यक्षमता तृतीय पुरस्कार, कै. कर्मयोगी शंकरराव पाटील उत्कृष्ट आर्थिक व्यवस्थापन पुरस्कार आणि सर्वोत्कृष्ट फायनान्स मॅनेजर योगीराज नांदखिले यांच्या रुपाने तिसरा पुरस्कार कारखान्याला मिळाला आहे.
राज्यस्तरीय ऊसभूषण पुरस्कारांचे मानकरी ‘सोनहिरा’चे रामदास पोळ (हेक्टरी ३२० टन- पूर्वहंगाम), विठ्ठलराव शिंदे साखर कारखान्याचे अमोल लोंढे (हे. २२८ टन – सुरू हंगाम) आणि खोडव्यासाठी वारणाचे शिवाजी देवकर (हे. २९० टन) हे प्रगतीशील शेतकरी आहेत.
पुरस्कारांची संपूर्ण यादी खालीलप्रमाणे…