श्री छत्रपती कारखाना देणार उसाला प्रतिटन सरसकट १०० रुपये अनुदान

आवडल्यास ही बातमी शेअर करा

बारामती : श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. शुक्रवार, दिनांक १६ जानेवारीपासून कारखान्यात गाळपासाठी येणाऱ्या सर्व प्रकारच्या (आडसाली, सुरू, पूर्व हंगामी आणि खोडवा) उसाला प्रतिटन सरसकट १०० रुपये अनुदान जाहीर करण्यात आले आहे. या निर्णयाची माहिती कारखान्याचे अध्यक्ष पृथ्वीराज जाचक आणि उपाध्यक्ष कैलास गावडे यांनी दिली.

कार्यक्षेत्रातील आडसाली उसाचे जास्त क्षेत्र आणि ऊस तोडीस होणारा विलंब लक्षात घेऊन, सभासदांचे आर्थिक नुकसान टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे १६ जानेवारीपासून गाळपास येणाऱ्या उसाला सभासदांना एकूण ३२०१ रुपयेप्रतिटन दर मिळणार आहे.

यावेळी कारखान्याचे संचालक अॅड. शरद जामदार, रामचंद्र निंबाळकर, शिवाजीराव निंबाळकर, पृथ्वीराज घोलप, गणपतराव कदम, प्रशांत दराडे, अजित नरुटे, विठ्ठलराव शिंगाडे, अनिल काटे, बाळासाहेब कोळेकर, संतोष मासाळ, नीलेश टिळेकर, सतीश देवकाते, अशोक पाटील, मंथन कांबळे, डॉ. योगेश पाटील, तानाजी शिंदे, माधुरी राजपुरे, सुचिता सपकळ, कार्यकारी संचालक अशोक जाधव, जनरल मॅनेजर हनुमंत करवर उपस्थित होते.

ऊस आपल्याच कारखान्यास देण्याचे आवाहन
जळीत ऊस जास्त प्रमाणात येत असल्याने उताऱ्यावर परिणाम होत आहे. १६ जानेवारीपासून जळीत उसास प्रतिटन दोनशे रुपयेप्रमाणे जळीत नुकसान भरपाई कपात करण्याचा निर्णयही घेण्यात आल्याचे सांगितले. पुढे कारखान्याचे ऊस गाळप व साखर उतारा यामध्ये वाढ झाली, तरच कारखाना आर्थिक गर्तेतून बाहेर पडेल. सभासदांनी माझा कारखाना माझी जबाबदारी ही जाणीव ठेवून चांगल्या प्रतीचा ऊस आपल्याच कारखान्यास गळीतास देऊन सहकार्य करण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »