महिलांसाठी उद्योजकता विकास कार्यशाळा

श्री दत्त शिरोळ कारखाना आणि एमसीडीसीचा संयुक्त उपक्रम
कोल्हापूर : श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे (शिरोळ, जि. कोल्हापूर) ज्येष्ठ संचालक, मार्गदर्शक गणपतराव पाटील यांच्या पुढाकाराने व महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ (पुणे) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित एक दिवसीय * कारखाना कार्यक्षेत्रातील महिलांसाठी उद्योजकता विकास कार्यशाळा व मशरूम उत्पादन तंत्रज्ञान प्रशिक्षण कार्यक्रम २४ मार्च २०२६ रोजी आयोजित करण्यात आला. त्याला महिलांचा मोठा प्रतिसाद मिळाला.
शेतकरी वि. का. स. संस्था सभागृह (शेडशाळ, शिरोळ) येथे हा कार्यक्रम घेण्यात आला. प्रारंभी क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले व स्व. सा. रे. पाटील यांच्या प्रतिमांचे पूजन व दीप प्रज्वलन कारखान्याचे मार्गदर्शक गणपतराव पाटील व चेअरमन रघुनाथराव पाटील आणि इतर मान्यवर संचालक महोदय यांच्या हस्ते झाले.
महाराष्ट्र सहकार विकास महामंडळाचे विभागीय समन्वयक अरुण काकडे यांनी प्रास्ताविकामध्ये महामंडळामार्फत आयोजित करण्यात येणाऱ्या विविध प्रशिक्षण कार्यक्रमाविषयी माहिती दिली.
या एकदिवसीय कार्यशाळेमध्ये नाशिकचे मशरूम उद्योजक किरण पवार यांनी ‘मशरूम म्हणजे काय?, मशरूमच्या विविध प्रजाती, पोषक घटक व औषधी गुणधर्म, विविध प्रकार, मशरूम लागवडीसाठी लागणारे साहित्य व उपलब्धता, मशरूम स्पॉन, उत्पादन तंत्र, ओयस्टर मशरूम उत्पादन तंत्र, बटन मशरूम उत्पादन तंत्रज्ञान, कंपोस्ट तयार करण्याची पद्धत, मशरूमचे लोकल ते ग्लोबल मार्केट डिमांड व प्रक्रियायुक्त उत्पादने’ यांवर मार्गदर्शन केले.
सिद्धार्थ मशरूम रिसर्च सेंटर नाशिकच्या उद्योजिका चेतना पवार यांनी मशरूम व्यवसायातील विविध वाव व संधी, मशरूम वरील कीड व रोग व्यवस्थापन, ग्रेडिंग, पॅकेजिंग व आवश्यक परवाने, तापमान नियंत्रित कसे करावे? मशरूम उद्योजक यशोगाथा, मशरूम उगविण्याचा कालावधी, तोडण्याची पद्धत, मशरूमचे बेड तयार करण्याची पद्धत, बेड ठेवण्याचे प्रकार, मशरूम तोडण्याच्या पद्धती विषयी विस्तृत अशी माहिती प्रोजेक्टर द्वारे दिली.
एम.सी.डी.सी. पुण्याचे प्रशिक्षण अधिकारी मयूर पवार यांनी कृषी प्रक्रिया उद्योगांसाठी केंद्र शासनाची प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना बाबत माहिती दिली. तर नागपूर विद्यापीठाचे माजी अधिष्ठाता डॉ. दिलीप वैरागडे यांनी उद्योजकता विकास परिचय, उद्योजकाचे गुण व ध्येय, शेती व्यवसाय व्यवस्थापन व व्यवसायाची वृद्धी याबाबत सखोल मार्गदर्शन केले. ..
प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या प्रशिक्षणार्थींना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले. यावेळी कारखान्याचे चेअरमन रघुनाथ पाटील, संचालक सर्वश्री रणजीत कदम, ज्योतीकुमार पाटील, भैय्यासो पाटील, महेंद्र बागे, संचालिका अस्मिता पाटील, संगीता पाटील कोथळीकर, पंचायत समिती सदस्या राजश्री माणकापूरे, ऊस विकास अधिकारी ए. एस. पाटील, दीपक कळेकर, संतोष दुधाळे, शिरोळच्या सहाय्यक निबंधक सहकारी संस्था उर्मिला राजमाने, ओंकार पुदाले, रावसाहेब चौगुले, हाजी आबासो गौस पाटील, अशोक शिरढोणे, श्रीमती शमशादबी पठाण, संजय मगदूम, आप्पासो मगदूम, आबासो पाटील, सुरेश केरीपाळे, राजेंद्र चौगुले, अशोक केरीपाळे, अमोल पाटील यांच्यासह महिला प्रशिक्षणार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या…
सामाजिक बांधिलकी म्हणून श्री दत्त शिरोळ कारखान्याने हा उपक्रम आपल्या कार्यक्षेत्रातील महिलांसाठी महाराष्ट्र सहकार विकास महामंडळाच्या सहकार्याने घेण्याचे ठरवले आहे. त्यातील हा पहिला कार्यक्रम सर्वांच्या सहकार्याने यशस्वीरित्या संपन्न झाला





