‘श्री विघ्नहर’कडून रू. २७०० ची पहिली उचल जमा

आवडल्यास ही बातमी शेअर करा

यंदाही चांगला दर देणार : चेअरमन सत्यशील शेरकर

पुणे : श्री विघ्नहर सहकारी साखर कारखाना गळीत हंगाम २०२३- २४ मध्ये गाळपास येणाऱ्या उसाला मागील वर्षाप्रमाणे चांगला दर देणार आहे. त्यामुळे ऊस उत्पादकांनी विचलित न होता सर्वाधिक ऊस विघ्नहर कारखान्याला गाळपास द्यावा, असे आवाहन श्री विघ्नहरचे चेअरमन सत्यशील शेरकर यांनी केले आहे.

यंदाचा विघ्नहर कारखान्याचा गळीत हंगाम जोरात सुरू असून ३ डिसेंबरअखेर १ लाख ८२ हजार १२० मेट्रिक टन उसाचे गाळप झाले असून १ लाख ७२ हजार ३०० साखर पोती उत्पादित झाली आहेत.

यंदाच्या वर्षी गाळपास येत असलेल्या उसाला पहिला हप्ता उचल म्हणून २ हजार ७०० रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केले आहेत. विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचा कारभार पारदर्शकपणे करून खर्चवजा जाता उर्वरित रक्कम शेतकऱ्यांना अदा करत असतो, असे अध्यक्ष सत्यशील शेरकर यांनी सांगितले.

कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष माजी खासदार स्व. निवृत्तीशेठ शेरकर यांच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार विघ्नहर कारखाना नेहमीच सभासदांच्या हिताची जपणूक करीत आला आहे. कारखान्याचे ऊस उत्पादक सभासद हे मालक आहेत, याची जाणीव सदैव संचालक मंडळाला असते, असे सत्यशील शेरकर यांनी सांगितले.

यंदाच्या वर्षी विघ्नहर कारखान्याचे ऊस गाळपाचे उद्दिष्ट १० लाख मेट्रिक टनाचे आहे. कारखान्याचे संचालक मंडळ सभासद, ऊस उत्पादक शेतकरी व कामगार यांचा एकोपा असल्यामुळे महाराष्ट्रातील नावाजलेल्या सहकारी साखर कारखान्यांमध्ये विघ्नहर साखर कारखान्याचे नाव अग्रक्रमाने घेतले जात आहे. गाळपास ताजा आणि पक्व ऊस उपलब्ध होत असल्याने साखर उतारादेखील यंदा चांगला मिळणार आहे. उसाची कमतरता असल्यामुळे बाहेरून देखील ऊस उपलब्ध करावा लागणार असल्याचे अध्यक्ष शेरकर यांनी सांगितले.

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Select Language »