श्री विघ्नहर कारखाना १५ मे पर्यंत चालणार
पुणे : चेअरमन सत्यशीलदादा शेरकर यांच्या नेतृत्वाखालील श्री विघ्नहर सहकारी साखर कारखाना येत्या १५ मे पर्यंत चालणार आहे. त्यामुळे तो यंदा सर्वात मोठा हंगाम घेणारा साखर कारखाना ठरेल.
श्री विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक भास्कर घुले यांनी सांगितले की, आमच्या कारखान्याच्या हद्दीत अद्याप मुबलक ऊस उपलब्ध असून, तो पूर्णपणे गाळप होईपर्यंत कारखाना सुरूच ठेवण्याचा निर्धार चेअरमन सत्यशीलदादा शेरकर आणि संचालक मंडळाने केला आहे. उसाचे एकही कांडे कार्यक्षेत्रात शिल्लक राहणार नाही याची कारखाना दक्षता घेईल.
सध्या साखर कारखाना साडेसहा हजार क्षमतेने चालत आहे. आमच्या कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील संपूर्ण ऊस गाळप होण्यासाठी आणखी बराच कालावधी लागेल. १५ मे पर्यंत कारखाना सुरू राहील, असा आमचा अंदाज आहे, असेही कार्यकारी संचालक घुले यांनी सांगितले.
कारखान्याचा गळीत हंगाम नोव्हेंबर २०२४ मध्ये सुरू झाला होता. आतापर्यंत सुमारे आठ लाख टनांवर ऊस गाळप करून ११.०८ च्या उताऱ्याने सुमारे साडेआठ लाख क्विंटलपेक्षा अधिक साखर उत्पादित केली आहे. एकूण गाळप दहा टनांपेक्षा अधिक होईल, असा कारखान्याचा अंदाज आहे.