विघ्नहर ३२०० रू. विनाकपात अंतिम दर

आवडल्यास ही बातमी शेअर करा

वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीच्या वातावरणात

पुणे : श्री विघ्नहर सहकारी साखर कारखान्याने गत हंगामातील उसासाठी प्रतिटन ३२०० रुपये एवढा विनाकपात अंतिम दर जाहीर करून, शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे.
कारखान्याची ४२ वी वार्षिक सभा कारखान्याचे अध्यक्ष सत्यशील शेरकर यांच्या अध्यक्षतेखाली खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. त्यावेळी अंतिम दराची घोषणा त्यांनी केली तेव्हा टाळ्यांचा कडकडाट झाला.

या सभेला मोठ्या संख्येने सभासद उपस्थित होते. सभेचे कामकाज होण्यापूर्वी कारखान्याचे संस्थापक-अध्यक्ष निवृत्तीशेठ नामदेव शेरकर व सोपानशेठ नामदेव शेरकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. सभासदांचे स्वागत सत्यशील शेरकर यांनी केले. विषयपत्रिकेचे वाचन कारखान्याचे कार्यकारी संचालक भास्कर घुले यांनी केले. ठरावाचे वाचन सचिव अरुण थोरवे यांनी केले.

सत्यशील शेरकर यांनी मागील सन २०२३-२४ गळीत हंगामात गाळपासाठी आलेल्या उसाला ३,२०० रुपये प्रतिटन विनाकपात बाजारभाव जाहीर केला. यामुळे सभासद, ऊस उत्पादकांत आनंदाचे वातावरण आहे. त्याचबरोबर कारखान्याच्या विस्तारित प्रकल्पाविषयी सत्यशील शेरकर यांनी सविस्तर माहिती दिली. मागील गाळप हंगामात जास्तीत जास्त ऊसपुरवठा करणारे शेतकरी, एकरी १११ टनांपेक्षा जास्त उत्पादन घेतलेले शेतकरी, जास्तीत जास्त ऊसतोडणी व ऊस वाहतूक करणारे कंत्राटदार, हार्वेस्टरने जास्तीत जास्त ऊसतोडणी करणारे कंत्राटदार, एकरी १०० टनापुढील उत्पादन घेणारे शेतकरी यांचा रोख रक्कम, सन्मानचिन्ह व प्रशस्तिपत्र देऊन सत्कार करण्यात आला.

कारखान्याचे विस्तारीकरण
एकरी १३६ टन ऊस उत्पादन घेणारे उल्हास जेजूरकर यांचे विशेष कौतुक करण्यात आले. मागील वर्षी इथेनॉल प्रकल्पाचे विस्तारीकरण केले तसेच ४० वर्षांपूर्वीच्या मशिनरीचा देखभाल खर्च वाढल्याने कारखान्याचे विस्तारीकरण करण्याचा निर्णय घेतला. हा प्रकल्प सर्वांच्या सहकार्याने पूर्ण करण्याचा संचालक मंडळाचा प्रयत्न असल्याचे सत्यशील शेरकर यांनी सांगितले.
विस्तारीकरणास सभासदांनी मान्यता दिली. वार्षिक सर्वसाधारण सभेच्या विषयपत्रिकेवरील सर्व विषय मंजूर करण्यात आले. विघ्नहर बदलत्या काळासोबत चालत आहे. स्मार्ट शेतकरी कार्ड, संगणकीकरण व इतर आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जात असल्याने कारखान्याची प्रगती होत आहे. याबाबत सभासदांनी समाधान व्यक्त केले. अनेक सभासदांनी प्रश्न विचारून चर्चेत सहभाग घेतला.

कारखान्यास नॅशनल फेडरेशन ऑफ को-ऑपरेटिव्ह शुगर फॅक्टरीजचा गळीत हंगाम २०२२-२३ साठीचा उच्च साखर उतारा विभागातील तांत्रिक कार्यक्षमतेचा द्वितीय क्रमांकाचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्याबद्दल सभासदांच्या वतीने अभिजित बढे व विकास चव्हाण यांनी कारखान्याचे अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि संचालक मंडळाचा सत्कार केला.
या वेळी कारखान्याचे सभासद शरद सोनवणे, आशा बुचके, रामदास थोरात, जयवंत भोर, अविनाश हडवळे, सुधाकर डुंबरे, सुनील कवडे, तान्हाजी बेनके, विजय भोर, अंबादास हांडे, नाथा धुमाळ, नीलेश बेनके, महेश शेळके, सुरेश वाणी, दिलीप गांजळे, अनघा घोडके आदींनी चर्चेत सहभाग घेतला. उपाध्यक्ष अशोक घोलप यांनी आभार मानले.

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Select Language »