नऊ लाख टन ऊस गाळपाचे श्रीनाथ म्हस्कोबा कारखान्याचे उद्दिष्ट

पुणे- गळीत हंगाम २०२५-२६ साठी श्रीनाथ म्हस्कोबा साखर कारखान्याची सर्व तयारी पूर्ण झाली असून, कारखान्याने ९ लाख मेट्रिक टन गाळपाचे उद्दिष्ट ठेवले आहे, असे प्रतिपादन कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष पांडुरंग राऊत यांनी केले. २२ व्या गाळप हंगामाकरिता बॉयलर अग्निप्रदीपन कार्यक्रमात ते बोलत होते.
आगामी हंगामासाठी १३ हजार १२१ हेक्टर उसाची नोंद झालेली आहे. ऊस गाळपासाठी मशिनरी व सर्व यंत्रणा सज्ज आहे, असे सांगताना, येत्या गळीत हंगामात कार्यक्षेत्रातील शेतकरी बांधवांनी जास्तीत जास्त ऊस गाळपास पाठवून सहकार्य करावे, असे आवाहन राऊत यांनी केले.
यावेळी कारखान्याचे कर्मचारी चतुरसेन बबन गायकवाड आणि त्यांच्या पत्नी उषाताई या दाम्पत्याच्या हस्ते व मान्यवरांच्या उपस्थितीत श्रीनाथ म्हस्कोबा महाराज यांचा अभिषेक करून विधिवत कारखान्याचा बॉयलर अग्निप्रदीपन सोहळा पार पडला.

मुख्य कार्यकारी अधिकारी डी. एम. रासकर म्हणाले की, येत्या हंगामाकरिता सर्व मशिनरी ओव्हरहॉयलिंग करून सज्ज करण्यात आलेल्या आहेत. यावर्षी मिलचे आधुनिकीकरण करण्यात आलेले आहे. त्यामुळे कमी वेळात जास्त ऊस गाळप करण्यात येणार आहे. साखर निर्मिती बरोबर उपपदार्थ उत्पादनावर अधिक भर दिला जाणार आहे. वीज निर्मितीकरिता १० मेगा वॅट क्षमतेचे नवीन टर्बाइन यावर्षी बसविले आहेत. शासनाने इथेनॉलच्या उत्पादनावरील सर्व निर्बंध काढून टाकल्याने इथेनॉलचे अधिक उत्पादन घेण्यात येणार आहे. डिस्टिलरी प्लॅन्ट व सीबीजी प्लॅन्ट पूर्ण क्षमतेने चालणार आहेत.
याप्रसंगी कारखान्याचे कार्याध्यक्ष अॅड. विकास रासकर, उपाध्यक्ष योगेश ससाणे, सह कार्यकारी संचालक माधव राऊत, संचालक महेश करपे, अनिल बधे, अनिल भुजबळ, किसन शिंदे, ज्ञानदेव कदम, ह.भ.प. हनुमंत शिवले महाराज, भगवान मेमाणे, मुकुंद दरेकर, डॉ. श्रीकांत कदम, मारूती भुमकर, चंद्रकांत ढमढेरे, लक्ष्मण कदम, यशोधन रासकर आदी मान्यवर उपस्थित होते.