‘श्रीनाथ म्हस्कोबा’कडून दोन लाख टन ऊस गाळप
पुणे : पाटेठाण (ता. दौंड) येथील श्रीनाथ म्हस्कोबा साखर कारखान्याने ४५ दिवसांत दोन लाख मेट्रिक टनांपेक्षा अधिक ऊस गाळप केला आहे. कारखान्याचा एफआरपीसाठी चालू साखर उतारा ११.८५ टक्के आहे व हंगामातील सरासरी साखर उतारा ११.०६ टक्के आहे. या हंगामात साखर कारखान्याचे सात लाख मेट्रिक टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट आहे
शेतकऱ्यांनी लागण केलेल्या उसाची नोंद व क्रमवारीनुसार ऊसतोडणी व्हावी, याकिरता कारखान्याने मोबाईल अॅप तयार केले असून, त्याप्रमाणे ऊसतोडणी कार्यक्रम करून ऊसतोड केली जात आहे. गाळपास आलेल्या उसाचे वजन अचूक व्हावे, याकिरता वजनकाटे शासनाकडून स्टॅंम्पिग करून घेतले जातात. वजन काट्यावर उसाचे वजन हे मॅनलेस (मनुष्यविरहित) पद्धतीने होते.
ऊस घेऊन येणाऱ्या वाहतूकदारांना वजनासाठी स्मार्टकार्ड दिलेले आहेत, त्यानुसार ऊसमालकाचे नाव, वाहतूकदाराचे नाव व इतर माहिती ऊसतोडणी स्लीपच्या स्वरूपात स्लिपबॉय मोबाईल अॅपद्वारे ऊसफडातून निघण्याच्या आगोदर तयार करतात. वाहतूकदाराचे वाहनचालक कारखान्यावर वाहन घेऊन आल्यावर सदर स्मार्ट कार्डद्वारे वाहन आल्याची नोंद नंबर टेकरकडे करून ऊस खाली करण्याकिरता त्यांचा नंबर आल्यावर तो स्वतः वजनकाट्यावर स्मार्ट कार्ड दाखवून भर वजन व रिकामे वजन करतो व त्यास निव्वळ वजनाची पावती मिळते.
आलेल्या उसाच्या वजनाचे मेसेज दररोज शेतकऱ्यांना पाठविले जातात. मनुष्यविरहित ऊस वजन ईआरपी प्रणालीद्वारे करणाऱ्या मोजक्याच कारखान्यांपैकी श्रीनाथ म्हस्कोबा साखर कारखाना एक आहे. त्यामुळे मानवी हस्तक्षेपास वाव नाही. यंदा कारखान्याचे दैनंदिन ऊस गाळप ५००० मे. टन होत आहे.
पुढील वर्षी गाळप क्षमता विस्तार : चेअरमन
श्रीनाथ म्हस्कोबा साखर कारखाना हा नेहमीच शेतकरी हिताचा विचार करत आलेला आहे. शेतकऱ्यांच्या उसाला योग्य भाव दिला जातो. वेळेवर पेमेंट दिले जाते. याव्यतिरिक्त सभासदांना लाभांशसुद्धा दिला जातो. सामाजिक बांधिलकी म्हणून काही उपक्रम राबविले जातात. कारखान्याला ऊस देण्यासाठी शेतकरी बांधवांचा कल पाहता व शेतकऱ्यांचा ऊस लवकर गळीतास येऊन रान इतर पिकासाठी मोकळे व्हावे, म्हणून पुढील वर्षी कारखान्याची ऊस गाळप क्षमता वाढविण्याचा कारखान्याचा मानस आहे. शेतकऱ्यांना महत्त्वाच्या कामी खर्चाकरिता पैसे उपलब्ध व्हावेत म्हणून पहिल्या हप्त्यापोटी कारखान्याने पहिल्या पंधरवड्यात आलेल्या उसास उचल म्हणून प्रतिटन २६०० रुपयांप्रमाणे अदा केलेले आहेत. परिसरातील इतर कारखान्यांच्या तुलनेत श्रीनाथ म्हस्कोबा कारखान्याचा उसाचा पहिला हप्ता बरोबरीने राहणार आहे, अशी माहिती कारखान्याचे चेअरमन डॉ. पांडुरंग राऊत यांनी दिली.