सिद्धेश्वरच्या ‘चिमणी’बाबत २० जूनला सुनावणी
सोलापूर : सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याची चिमणी पाडकामाला स्थगिती देण्यास उच्च न्यायालयाने शुक्रवारी नकार दिला. यावर २० जून रोजी पुन्हा सुनावणी होणार आहे.
महापालिकेने २७ एप्रिल रोजी सिद्धेश्वर कारखान्याला चिमणी पाडकामाची नोटीस बजावली होती. ४५ दिवसांच्या आत चिमणीचे पाडकाम करावे असे पालिकेने म्हटले होते. या नोटिसीला स्थगिती द्यावी या मागणीसाठी कारखान्याने उच्च न्यायालयात धाव घेतली. न्यायमूर्ती सुनील शुक्रे, न्यायमूर्ती आर. एन. लढ्ढा यांच्यासमोर गुरुवारी सुनावणी झाली.
महापालिकेच्या वतीने महाधिवक्ता बिरेंद्र सराफ, अॅड. तेजस देशमुख यांनी बाजू मांडली. न्यायालयाने चिमणी पाडकामाला स्थगिती देण्यास नकार देताना, कारखान्याने यावर आपली बाजू २० जून रोजी मांडावी, असे आदेश दिले.