सिद्धेश्वर’साठी १७ मार्चला मतदान, मात्र अवघे ९ टक्के सभासद पात्र

आवडल्यास ही बातमी शेअर करा

छत्रपती संभाजीनगर : सिल्लोड तालुक्यातील सिद्धेश्वर सहकारी साखर कारखाना, माणिकनगरच्या (siddheshwar sugar sillod) निवडणुकीचा बिगुल वाजला असून, १६ फेब्रुवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे, तर १७ मार्चला मतदान होईल. सध्या हा कारखाना खडकपूर्णा ॲग्रो लि. या कंपनीला भाडेतत्त्वावर दिला आहे.
मात्र या निवडणुकीची गंमत अशी आहे की, सुमारे दहा हजार सभासदांपैकी अवघे एक हजार मतदार मतदानास पात्र ठरले आहे.

गेल्या वर्षी जून महिन्यात या कारखान्याची निवडणूक घेण्याची प्रक्रिया सुरु झाली होती. अंतिम यादीही प्रसिध्द करण्यात आली होती. मात्र मध्येच सहकार क्षेत्रातील निवडणुकांवर स्थगिती आल्याने जैसे थे ठिकाणी निवडणूक प्रक्रिया थांबवण्यात आली होती. यानंतर १२ फेब्रुवारीला निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला. यात आता पुन्हा थांबलेल्या प्रक्रियेपासून निवडणूक प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. १२ ते १६ फेब्रुवारी उमेदवारी अर्ज दाखल करणे. २२ फेब्रुवारीला छानणी, २१ फेब्रुवारी ते ६ मार्च उमेदवारी अर्ज मागे घेणे, ७ मार्च उमेदवारांची अंतिम यादी प्रशिध्द व चिन्ह वाटप, १७ मार्चला मतदान तर १८ मार्चला मतमोजणी होणार आहे.

या कारखान्यावर कोट्यावधींचे कर्ज असल्याने बरेच वर्ष कारखान बंद पडला होता. विद्यमान चेअरमन व संचालक मंडळाने हा कारखाना सध्या भाडेतत्वावर दिलेला आहे. भाड्यातील रक्कमेतून कर्ज फेडण्यात येत आहे. सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या उपदानाची रक्कम देण्यासाठी जमीन विक्री करावी लागली. काही कर्मचाऱ्यांची रक्कम देण्यासाठी न्यायालयाच्या आदेशाने जमीन विक्री काढलेली आहे. एकेकाळी या कारखान्यावर तालुक्याची आर्थिक भिस्त अवलंबून होती. मात्र गेल्या दीड तपात कारखाना आर्थिक डबघाईला आला असून दिवसेंदिवस कर्जाचा डोंगर वाढत चालला आहे.

कारखान्याच्या संस्थापकांचे कुटुंब अपात्र

कै. माणिकदादा पालोदकर यांनी हा प्रकल्प तालुक्यात उभा केला. एवढेच नव्हे तर तालुक्यात सहकाराची महुर्तमेढच त्यांनी रोवली. त्यांच्या नंतर प्रभाकर पालोदकर यांनी कारखाना उत्तम प्रकारे चालवला. तसा सहकार क्षेत्राचा दांडगा अनुभव त्यांना आहे. मात्र या निवडणूक प्रक्रियेत चक्क प्रभाकर पालोदकर यांच्यासह त्यांचे अख्खे कुटुंब अपात्र ठरले आले आहे.

१० हजार ५१९ सभासद अपात्र
सिद्धेश्वर कारखान्याचे तालुक्यासह फुलंब्री व भोकरदन तालुक्यात असे ११ हजार ७२८ सभासद होते. मात्र निवडणूक प्रक्रियेत शेअर्स (भाग भांडवल) कमी असल्याने तब्बल १० हजार ५१९ सभासद अपात्र ठरवले गेले आहेत. यामुळे आता फक्त १ हजार २०९ सभासद पात्र राहिले आहेत. यात सर्वाधिक ६०८ सभासद भोकरदन तालुक्यात आहे. सिल्लोड तालुक्यात ५२९ तर फुलंब्री तालुक्यात अवघे ८२ सभासद राहिले आहे. या निवडणुकीत भोकरदन तालुक्यातील सभासदांची भूमिका महत्वाची राहणार आहे.

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Select Language »