‘सोमेश्वर’ची फसवणूक; लेबर ऑफिसरसह संबंधित सर्व कर्मचारी निलंबित

पुणे : श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्यामध्ये रोजंदारी तत्त्वावर काम करणाऱ्या कर्मचारी व कामगार यांचे हजेरी नोंदीमध्ये संगनमताने कारखाना प्रशासनाची फसवणूक करुन आर्थिक घोटाळा केल्याप्रकरणी कारखान्याचे लेबर व टाईम ऑफीस विभागातील लेबर ऑफीसर, हेड टाईम किपर, टाईम किपर, सर्व क्लार्क्स व कर्मचारी यांचे निलंबन करण्याचा निर्णय संचालक मंडळाने घेतला आहे.
या सर्वांविरोधात व लेबर पुरवठा करणाऱ्या कंत्राटदार यांच्यावर पोलिसांत गुन्हा नोंद करणार असल्याची माहिती श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांनी दिली.
जगताप यांनी दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हंटले आहे की, आपला श्री सोमेश्वर कारखाना सर्वच क्षेत्रामध्ये आघाडीवर असताना, कारखान्यात चुकीचे काम करणाऱ्या कोणत्याच घटकाला पाठीशी घालू नये, अशा सक्त सूचना कारखान्याचे मार्गदर्शक व राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वेळोवेळी दिल्या आहेत, त्याला अनुसरुनच संचालक मंडळ काम करण्याचा प्रयत्न करत असते.
कारखान्याच्या प्रगतीमध्ये अडसर ठरेल व कारखान्याचे नुकसान होईल असे काही अधिकारी, कामगार यांनी कामकाज केल्याचे निदर्शनास आल्याने या अधिकारी व कर्मचारी यांचे विरोधात तात्काळ कारवाई करण्याचा निर्णय संचालक मंडळाने घेतला असून नियमानुसार कायदेशीर मुद्दे विचारात घेवून याप्रकरणाची इंडस्ट्रीयल व लेबर न्यायालयामध्ये काम पाहणाऱ्या तज्ज्ञ वकिलांची चौकशी अधिकारी म्हणून नेमणूक करुन नियमाप्रमाणे सखोल तपास करण्याचा निर्णयही संचालक मंडळाने घेतला आहे.
याप्रकरणाची गंभीरता लक्षात घेता सन २०१५ पासून आजअखेरपर्यंत रोजंदारी कर्मचाऱ्यांची हजेरी नोंद व प्रत्यक्ष दिलेला पगार, झालेले कामकाज इत्यादीची मान्यताप्राप्त सनदी लेखापालामार्फत परीक्षण करुन चौकशी केली जाईल. या प्रकरणामध्ये दोषी असणाऱ्या व्यक्तींवर कठोरपणे कारवाई करणेचा संचालक मंडळाने निर्णय घेतलेला असून यामध्ये कोणालाही पाठीशी घातले जाणार नाही असे संचालक मंडळाच्या वतीने समस्त सभासद व शेतकऱ्यांना आम्ही आश्वस्त करत आहोत, असेही जगताप यांनी म्हटले आहे.