सोमेश्वर कारखान्याचा महत्त्वपूर्ण निर्णय : विनाकपात ऊसबिले अदा करणार

बारामती : श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याने यंदाच्या गाळप हंगामासाठी शेतकऱ्यांच्या हिताचा मोठा निर्णय घेतला आहे. कारखान्याचा रास्त आणि किफायतशीर दर (FRP) ३२८५ रुपये प्रति मेट्रिक टन इतका असताना, संचालक मंडळाने प्रथम हप्त्यापोटी ३,३०० रुपये प्रति टन इतके अधिक दर देण्याचे निश्चित केले आहे. या निर्णयामुळे सोमेश्वर कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील सभासद आणि बिगर सभासद शेतकऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा मिळाला आहे दरम्यान, शेतकऱ्यांनी ऊस तोडणीसाठी मजुरांना पैसे देऊ नयेत, ऊस पेटवून तोडणी करू नये आणि कारखान्याकडे नोंदवलेला ऊस इतरत्र घालू नये, असे आवाहन कारखान्याचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांनी केले आहे.
उचांकी उतारा: कारखान्याने आजअखेर ६ लाख ३४ हजार १३५ मेट्रिक टन उसाचे गाळप केले असून, ११.२७% इतका उच्चांकी साखर उतारा राखला आहे.
कर्जवसुली ऐच्छिक: १६ डिसेंबर २०२५ पासून पुढील ऊस बिलांमधून कोणतीही सोसायटी किंवा व्यापारी बँकांची कर्जवसुली केली जाणार नाही. ही वसुली पूर्णपणे ऐच्छिक करण्यात आली आहे, ज्यामुळे शेतकऱ्यांना बिलाची पूर्ण रक्कम मिळणार आहे.
हंगामी अनुदान: कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांना हंगामाच्या उत्तरार्धात प्रोत्साहनपर अनुदान जाहीर केले आहे:
फेब्रुवारी २०२६ मध्ये येणाऱ्या उसाला: १०० रुपये प्रति टन.
मार्च २०२६ मध्ये येणाऱ्या उसाला: २०० रुपये प्रति टन.
एप्रिल २०२६ मध्ये येणाऱ्या उसाला: ३०० रुपये प्रति टन.






