‘सोमेश्वर’ महाराष्ट्रात अव्वल, ‘एफआरपी’पेक्षा पाचशे जादा
सलग पाच वर्षे तीन हजारांवर दर
पुणे : ऊस दराच्या आघाडीवर सोमेश्वर सहकारी साखर कारखाना राज्यात अव्वल ठरला आहे. कारखान्याच्या संचालक मंडळाने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली गत २०२२-२३ या गळीत हंगामातील अंतिम दर प्रति टन ३३५० रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे.
त्यामुळे शेतकऱ्यांना ‘एफआरपी’पेक्षा पाचशे रुपये अधिक मिळणार आहेत. सध्या ‘एफआरपी’ पेक्षा जादा रक्कम देण्यात ‘सोमेश्वर’ राज्यात प्रथम क्रमांकावर आहे. तसेच आम्ही सलग पाच वर्षे तीन हजारपेक्षा अधिक दर दिला आहे, अशी माहिती कारखान्याचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांनी दिली.
‘सोमेश्वर’ने सरत्या हंगामात १२ लाख ५६ हजार टन गाळप करून ११.९२ टक्के साखर उतान्यानुसार १४ लाख ६७ हजार क्विंटल साखरनिर्मिती केली होती. सहवीजनिर्मितीतून ५ कोटी युनिटची वीजविक्री केली, तर डिस्टिलरीतून ९१ लाख लिटर अल्कोहोल व ४९ लाख लिटर इथेनॉल निर्मिती केली होती.
‘सोमेश्वर’ची एफआरपी २८५० रुपये प्रतिटन इतकी असून, आतापर्यंत २९०० रुपये दिले आहेत. आता दिवाळीपूर्वी उर्वरित ४५० रुपये प्रतिटन इतकी रक्कम शेतकऱ्यांना मिळणार आहे, असे अध्यक्ष जगताप यांनी सांगितले.
सोमेश्वर कारखान्याने परंपरेनुसार ऊस घालणाऱ्या शेतकन्यांमध्ये भेद न करता सभासदांच्या बरोबरीने तब्बल १ लाख ५ हजार टन ऊस घालणारे बिगरसभासद, गेटकेनधारक, शेअर मागणीदार अशा शेतकऱ्यांनाही प्रतिक्विंटल ३३५० रुपयांचा दर देण्याचा निर्णय घेतला आहे. आगामी हंगामासाठी ‘सभासदांप्रमाणे दर दिला जाईल’ असे ऊसनोंदीच्या करारातच स्पष्ट केले आहे.
सहवीजनिर्मिती व डिस्टिलरी प्रकल्पांतून ५० कोटींचा नफा, २ लाख ४२ हजार क्विंटल साखर सरकारी कोट्यातून प्रतिक्विंटल ३८०० रुपये दराने निर्यात, सहा लाख ३७ हजार क्विंटल साखरेची खुली निर्यात, साखरविक्रीची सरासरी उत्तम, चांगला साखर उतारा आदी घटकांमुळे सर्वाधिक दर देऊ शकलो, असेही जगताप यांनी स्पष्ट केले.