साखर कारखाने २१ नोव्हेंबरनंतर सुरु करा : खोत

आवडल्यास ही बातमी शेअर करा

पुणे : राज्य विधानसभा निवडणुकीची मतदानाची तारीख २० नोव्हेंबर असल्याने, राज्यातील साखर कारखाने २१ नोव्हेंबरनंतर सुरू करावेत, ज्यामुळे कोणीही मतदानापासून वंचित राहणार नाही, अशी मागणी आमदार सदाभाऊ खोत यांनी केली आहे.

मराठवाड्यातून मोठ्या प्रमाणात ऊसतोड कामगार स्थलांतर करत असतात. या कामगारांना मतदान करता यावे यासाठी २१ नोव्हेंबरपासून साखर कारखाने सुरु करण्यात यावेत अशी मागणी व्हिडीओद्वारे आमदार सदाभाऊ खोत यांनी केली आहे.

खोत म्हणाले, महाराष्ट्र विधानसभेची रणधुमाळी सुरू झाली आहे. मंत्रिसमितीच्या शिफारशीनुसार, साखर आयुक्तांनी राज्यातील साखर कारखाने १५ नोव्हेंबरनंतर सुरु करावेत असे आदेश काढले आहेत. हा आदेश मागे घेणे गरजेचे आहे. कारण राज्यातील ऊसतोडणीसाठी मजूर वेगवेगळ्या राज्यात, वेगवेगळ्या जिल्ह्यात जात असतात. हे सर्व मजूर मतदानापासून वंचित राहतील, त्यांचं मतदान होणं गरजेचे आहे. मतदानाचा हक्क प्रत्येकाला बजावता आला पाहिजे या भूमिकेतून राज्यातील सर्व साखर कारखाने २१ नोव्हेंबरनंतर सुरू करावेत.

‘शुगरटुडे’ची भूमिका
साखर उद्योग आधीच विविध आव्हानांना तोंड देत आहे, त्यात हंगाम लांबवणे अत्यंत चुकीचे ठरेल. त्यामुळे आमचे असे आवाहन आहे की जाहीर केल्याप्रमाणे १५ नोव्हेंबरपासून गळीत हंगाम २०२४-२५ ला सुरुवात केली. त्यामुळे साखर कारखाने आणि सर्व संबंधित घटकांचे प्रचंड नुकसान टळेल.

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »