साखर कारखाने कृषी प्रक्रिया केंद्रे व्हावीत : मराठे

आवडल्यास ही बातमी शेअर करा

डॉ. विखे पाटील सहकार अध्यासनातर्फे पुणे विद्यापीठात आयोजित राज्यस्तरीय परिषदेत वैचारिक मंथन

पुणे : साखर कारखान्यांचे अर्थकारण मजबूत करायचे असेल, तर ते वर्षभर चालायला हवीत, त्यासाठी ते केवळ साखर किंवा उपपदार्थ उत्पादक न राहता, त्यांचे रूपांतर कृषी प्रक्रिया केंद्रांमध्ये (ॲग्रो प्रोसेसिंग हब) झाले पाहिजे, असा महत्त्वाचा सल्ला सहकार आणि बँकिंग तज्ज्ञ सतीश मराठे यांनी दिला.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील सहकार अध्यासनातर्फे आयोजित राज्यस्तरीय साखर परिषदेत, रिझर्व्ह बँक आणि नाबार्डचे संचालक असलेले मराठे बोलत होते. विद्यापीठातील संत ज्ञानेश्वर सभागृहात ही परिषद झाली. यावेळी मंचावर प्र-कुलगुरू डॉ. पराग काळकर, माजी साखर आयुक्त शेखर गायकवाड, विश्वगुरू इन्फोटेकचे राजेंद्र गांगर्डे, डॉ. तापकीर, डॉ. रवींद्र शिंगणापूरकर, अध्यासनाचे प्राध्यापक डॉ. अनिल कारंजकर इ. ची उपस्थिती होती. यावेळी पत्रकार नंदकुमार सुतार संपादित, डॉ. विखे पाटील यांच्यावरील ‘शुगरटुडे’ मासिकाच्या विशेषांकाचे प्रकाशन झाले. परिषदेला श्रीनाथ म्हस्कोबा साखर कारखान्याचे अध्यक्ष पांडुरंग राऊत, कार्याध्यक्ष विकास रासकर, राज्यातील विविध साखर कारखान्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

डॉ. कारंजकर यांनी प्रस्ताविक करताना, परिषदेच्या आयोजनामागील उद्देश सांगितला. या परिषदेतील सूचनांचा अहवाल केंद्रीय सहकारमंत्री अमित शहा यांच्यापर्यंत पोहचवला जाणार आहे, असेही सांगितले. डॉ. काळकर यांनी सर्व प्रतिनिधींचे स्वागत करताना, अशा स्वरूपाची परिषद पहिल्यांदाच विद्यापीठात आयोजित केल्याबद्दल अध्यासनाचे कौतुक केले.

अध्यक्षीय भाषणात सतीश मराठे यांनी साखर उद्योगाच्या आर्थिक उत्कर्षासाठीचा मार्ग सांगितला. ते म्हणाले, प्रचंड मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक असलेले साखर कारखाने अवघे दोन-तीन महिनेच चालतात. जगाच्या पाठीवर अशा स्वरूपाचा सीझनल चालणारा कोणताही उद्योग नाही. त्यामुळे आता तरी या उद्योगाने आपले उत्पादन वर्षभर कसे चालेल याचा विचार करायला हवा आणि त्यासाठी साखरेबरोबरच इतर कृषी उत्पादनांवरही भर देऊन साखर कारखाने वर्षभर चालणारी कृषी प्रक्रिया केंद्रे म्हणून उभी करावीत.

परिषदेत उद्‌घाटन सत्रासह चार चर्चासत्रे झाली. दुसऱ्या चर्चासत्रात यशदाचे अतिरिक्त महासंचालक शेखर गायकवाड, साखर उद्योग तज्ज्ञ दिलीप पाटील, राज्य सहकारी बँकेचे माजी व्यवस्थापकीय संचालक देशमुख, ‘विस्मा’चे कार्यकारी संचालक अजित चौगुले, लेखा परीक्षक संतोष जाधव यांनी सहभाग घेतला. गायकवाड यांच्या खुमासदार सूत्रसंचलनामुळे चर्चासत्र रंगतदार झाले. सध्याच्या परिस्थीतीत एकरकमी एफआरपी देण्यामधील अडचणींसोबत, व्यवस्थापनासमोरील आव्हाने यावर चर्चा झाली. या अडवणी सोडवल्या नाही तर साखर उद्योग फार काळ तग धरणे अशक्य आहे, असा चर्चेचा संदेश होता.

कारखान्यांची आर्थिक शिस्त, नवे तंत्रज्ञान आणि ऊस विकासा इ. वर तिसऱ्या सत्रात चर्चा झाली. अधक्षस्थानी श्रीनाथ म्हस्कोबा साखर कारखान्याचे चेअरमन पांडुरंग राऊत होते. तर मुख्य कार्यकारी अधिकारी डी. एम. रासकर, महिंद्र इन्फोटेकचे मंदार गडगे, ऊसतज्ज्ञ डॉ. सुरेश पवार यांनी सहभाग घेतला. अत्यंत कमी खर्चात साखर कारखाना कसा चालवता येतो हे रासकर यांनी आपल्या कारखान्यावर केलेल्या यशस्वी प्रयोगांचा उल्लेख करत, सोदाहरण स्पष्ट केले. कृत्रिम तंत्रज्ञानाचा वापर करून ऊस उत्पादन आणि उतारा लक्षणीयरीत्या वाढवणे शक्य आहे, यासाठी आम्ही अत्यंत स्वस्त मॉडेल विकसित केले आहे, असे गडगे यांनी सांगितले. ऊस पिकाबाबतचे गैरसमज दूर केले पाहिजेत, असे आग्रही प्रतिपादन पवार यांनी केले.

समारोपाच्या सत्रामध्ये माजी साखर आणि सहकार आयुक्त, तसेच सहकारी संस्था निवडणूक प्राधिकारणाचे अध्यक्ष अनिल कवडे यांनी मार्गदर्शन केले. साखर आणि सहकार क्षेत्रातील विविध उदाहरणे सांगून त्यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना प्रेरित केले. डॉ. कारंजकर यांनी आभार मानले. या परिषदेच्या यशासाठी विद्यापीठाच्या वाणिज्य विभागाच्या विद्यार्थ्यांनी सर्व व्यवस्था पाहिली. विद्यापीठाच्या कृषी व्यवस्थापन शाखेच्या विद्यार्थ्यांनी परिषदेला लावलेली उपस्थिती लक्षणीय ठरली.

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »