तुळजाभवानी साखर कारखान्यात झालेले ‘पाप’ कोण फेडणार?
तुळजापूरचे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते , माजी मंत्री मधुकरराव चव्हाण, वय ९० वर्षे, अजूनही ‘युवकांनाही लाजवेल’ अशा उत्साहात निवडणूक लढण्यास तयार आहेत. मागील दोन निवडणुकांमध्ये “ही शेवटचीच” म्हणत मतदारांना गोंजारणारे चव्हाण यंदा “खंडोबा बळ देईल तोपर्यंत” म्हणत पुन्हा मैदानात उतरतील, अशी जोरदार चर्चा आहे. राणा जगजितसिंह पाटील यांनी मागील निवडणुकीत त्यांना ‘आस्मान” दाखवले असले तरी, चव्हाण यांनी त्या ‘आस्मानाला’ चांगलंच थोपवून धरलंय. त्यांच्या या उत्साही स्वभावामुळे लोकांनी त्यांना ‘वयोवृद्ध किशोर’ अशी नवीन उपाधी दिली आहे.
चव्हाण यांची अणदूरच्या श्री खंडोबावरील भक्ती तर प्रसिद्धच आहे, परंतु खंडोबाच्या मंदिरात नवीन सभागृह बांधण्याची कल्पना त्यांच्या डोक्यात कधी आली नाही, हे मात्र लोक विसरत नाहीत. असो, तुळजापूरच्या श्री तुळजाभवानी नावाने चव्हाणांचे कारखानदारीच्या विश्वातील कारनामे मात्र तितकेच गाजले. साखर कारखाना आणि सूतगिरणी उभा करणे म्हणजे खरोखरच ‘पैशाच्या गोडव्याचा’ अनुभव घेतल्यासारखे होते. मात्र, १५ वर्षांत गोडपणाचा गोडवा गेला आणि कारखान्याने थेट ‘भंगारच्या रांगेत’ प्रवेश केला. नळदुर्गच्या खताच्या कारखान्याचा ‘कचरा’ झालाय आणि श्री खंडोबा पणन संस्थेचा देखील सांगाडा उरलाय.
मधुकररावांनी ‘धतूराचा प्रसाद’ देऊन सि. ना. आलुरे गुरुजींना बाजूला करत तुळजाभवानी कारखान्याची सत्ता स्वतःच्या हाती घेतली, पण ती सत्ता १५० कोटींच्या कर्जात बुडाली आणि आता हा वारसा पुत्र सुनीलच्या गळ्यात ‘म्हाताऱ्या तंत्रज्ञाच्या’ अनुभवाप्रमाणे अडकला आहे. शेवटी हे सगळं ‘घराण्याच्या’ नावावरच. सध्या नाव गोकुळचे आणि गाव चव्हाणांचे आहे.
शेतकऱ्यांनी पैसे मागत चव्हाणांच्या मोर्चे काढले, पण चव्हाणांनी ते मोर्चे ‘तुला काय सांगू’ अशा अविर्भावात टाळले. आता मात्र भाजपच्या दरवाज्यावर सुनील चव्हाण यांचा दावा ठोकला गेला, पण देवेंद्र फडणवीस यांनी तो ‘राजकीय प्रसाद’ स्विकारायला नकार दिला. चव्हाणांनीही मग फडणवीसांना पापाची गाठ घातली, “हे पाप तुम्हाला फेडावे लागेल” अशी गर्जना केली. पण खरा सवाल आहे—चव्हाणांच्या ” तुळजाभवानी ” कारखान्यात झालेले ‘पाप’ कोण फेडणार?
– बोरूबहाद्दर
Courtesy – Dharashiv Live