थकीत ८१७ कोटींच्या वसुलीसाठी धडक कारवाई
पुणे : एफआरपी रक्कम ऊस उत्पादक शेतकऱ्यांना देण्यात संपूर्ण देशात आघाडीवर असलेल्या महाराष्ट्राला थकबाकीची थोडी काळी किनारही आहे. ही रक्कम ८१७ कोटीं आहे, तर अधिक थकबाकी ठेवणाऱ्या ८७ साखर कारखान्यांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. अशा कारखान्यांवर साखर आयुक्तांनी धडक कारवाई सुरू केली आहे.
थकबाकी असणाऱ्या साखर कारखान्यांच्या विरोधात राज्य शासनाने ठाम भूमिका घेतली आहे. मागच्या हंगामात 211 साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांकडून ऊसाची खरेदी केली होती. त्यातील सुमारे दीडशेवर कारखान्यांनी 100 टक्के एफआरपी चुकती केली आहे. मोठी थकबाकी असणाऱ्या नऊ कारखान्यांच्या विरोधात साखर आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार यांनी महसूल वसुली प्रमाणपत्र (आरआरसी) अनुसार कायर्वाही सुरू केली आहे. ज्या जिल्ह्यात हे कारखाने आहेत, तेथील जिल्हाधिकाऱ्यांना साखर आयुक्तांची पत्रे गेली आहेत. आरआरसी काढताच संबंधित कारखान्याच्या मालमत्ता जप्त करून शेतकऱ्यांना थकबाकीची रक्कम दिली जाते.
एकूण एफआरपीच्या तुलनेत थकबाकीचे प्रमाण दोन टक्क्यांच्या आत असले, तरी एफआरपी थकबाकी ठेवणे बेकायदेशीर असल्याने साखर आयुक्तांनी आक्रमक भूमिका घेतली आहे.