साखर कारखान्यांनी बायोगॅस प्रकल्प उभारावेत : डॉ. खेमनार

आवडल्यास ही बातमी शेअर करा

पुणे : प्रेसमडपासून बायोगॅस उत्पादन अतिरिक्त उत्पन्नाचे चांगले साधन आहे . त्यामुळे साखर कारखान्यांनी बायोगॅस प्रकल्प उभे करावेत, असे आवाहन साखर आयुक्त डॉ. कुणाल खेमनार यांनी केले आहे.

राज्यातील साखर कारखान्यांमध्ये उत्पादित होत असलेल्या प्रेसमडचे प्रमाण आणि किलोस ७० रुपये, अशी किमान हमी किंमत लक्षात घेता १ लाख ७२ हजार टन कॉम्प्रेस्ड बायोगॅस (सीबीजी) निर्माण करण्याची क्षमता आहे. यापासून साखर कारखान्यांना बाराशे कोटी रुपयांचे उत्पन्न मिळू शकते.त्यादृष्टीने प्रेसमडपासूनचे बायोगॅस प्रकल्प उभारावेत, असे आवाहन एका परिपत्रकाद्वारे साखर आयुक्त डॉ. खेमनार यांनी केले आहे. बायोगॅसनिर्मिती हा एक शाश्वत आणि पर्यावरणपूरक ऊर्जास्रोत आहे. देशाच्या कच्च्या तेलाची गरजेपैकी ७७ टक्के आयात आणि नैसर्गिक गॅसच्या गरजेपैकी सुमारे ५० टक्के आयात करावी लागते. या पार्श्वभूमीवर कारखान्यांना अतिरिक्त उत्पन्नाचे साधन म्हणून सीबीजीकडे पाहावे, असे मार्गदर्शन त्यांनी केले आहे.

राज्यात २१० साखर कारखान्यांनी गतवर्ष २०२३-२४ मध्ये १०७६ लाख मे. टन उसाचे गाळप करून ११० लाख मे. टन साखर उत्पादन केले. एक मेट्रिक टन उसाचे गाळप केल्यास सुमारे ४० किलो (४ टक्के) प्रेसमड तयार होतो. यानुसार २०२३-२४ च्या गाळप हंगामात सुमारे ४३ लाख मेट्रिक टन प्रेसमड (४ टक्के) तयार झालेला आहे. साखर कारखान्यांनी प्रेसमडपासून बायोगॅसनिर्मिती केल्यास अतिरिक्त उत्पन्न मिळू शकणार आहे.

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Select Language »