हार्वेस्टर चालकांच्या बिलातून पाचटाची वजावट नको – साखर आयुक्त

आवडल्यास ही बातमी शेअर करा

पुणे : ऊस तोडणी यंत्रधारकांच्या बिलामधून पाचटाच्या अनुषंगाने कोणतीही वजावट करू नये, अशी महत्त्वपूर्ण सूचना साखर आयुक्त सिद्धाराम सालीमठ यांनी परिपत्रकाच्या माध्यमातून सर्व साखर कारखान्यांना दिली आहे.

ऊस तोडणी यंत्राने (हार्वेस्टर) तोडलेल्या उसाच्या वजनातून सरसकट ४.५ टक्के पाचटाचे वजन वजावट करावी याबाबतचा शासन निर्णय दि. १२ ऑक्टोबर, २०२२ रोजी झाला. यासंदर्भात महाराष्ट्र राज्य ऊस तोडणी मशिन मालक संघटनेने मार्च महिन्यांत साखर आयुक्तालयासमोर ठिय्या आंदोलन करून उसाच्या पाचट वजावट आणि अन्य मुद्दे साखर आयुक्तांच्या निदर्शनास आणून दिलेले होते. त्यावेळीही आयुक्तालयाने कारखान्यांना योग्य त्या सूचना देण्याचे आश्वासन आंदोलनकत्र्यांना दिले होते. त्यानुसारच ४ एप्रिल रोजी साखर आयुक्तांनी सर्व साखर कारखान्यांना तशा सूचना दिलेल्या आहेत.

या बाबतच्या परिपत्रकात म्हटले आहे की, शासनाच्या १२ ऑक्टोबर २०२२ च्या संबंधित निर्णयाची अंमलबजावणी योग्य रीतीने होण्याच्या अनुषंगाने साखर आयुक्तांनी ऊस तोडणी यंत्राशी संबंधित बाबीसंदर्भात सर्व साखर कारखान्यांना आवश्यक त्या सूचना द्याव्यात, असे नमूद केले आहे. त्यानुसारच सर्व साखर कारखान्यांना ऊस तोडणी यंत्रधारकांच्या बिलामधून पाचटाच्या अनुषंगाने कोणतीही वजावट करण्यात येऊ नये, असे म्हटलेले आहे. या परिपत्रकाच्या प्रती सर्व प्रादेशिक साखर सहसंचालक यांच्यासह साखर कारखान्यांची शिखर संस्था असलेल्या राज्य सहकारी साखर कारखाना संघ आणि वेस्ट इंडियन शुगर मिल्स असोसिएशन (विस्मा) यांनाही कळविण्यात आले आहे.

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »