साखर सेवन वाढले, कारण जागतिक तापमान वाढ

तापमानवाढीमुळे अमेरिकेत साखरेचा वापर वाढतोय: नव्या संशोधनाचा धक्कादायक दावा; आरोग्यावर गंभीर परिणाम होण्याची भीती
वॉशिंग्टन : जागतिक तापमानवाढ ही केवळ हवामानाशी संबंधित समस्या नसून, ती थेट मानवी खाण्याच्या सवयींवर आणि पर्यायाने आरोग्यावर परिणाम करत असल्याचे एका नव्या संशोधनातून समोर आले आहे . “नेचर क्लायमेट चेंज” (Nature Climate Change) या जर्नलमध्ये सोमवारी प्रकाशित झालेल्या एका अभ्यासानुसार, वाढत्या उष्णतेमुळे अमेरिकेतील लोक जास्त साखर खात आहेत, विशेषतः गोड पेये, आईस्क्रीम आणि गोठवलेल्या मिष्टान्नांच्या स्वरूपात…. याचे आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतात, अशी चिंताही व्यक्त करण्यात आली आहे.
संशोधनातील प्रमुख निष्कर्ष :
- संशोधकांनी २००४ ते २०१९ या कालावधीतील अमेरिकन कुटुंबांच्या अन्न खरेदीच्या डेटाचे आणि प्रादेशिक हवामान डेटाचे विश्लेषण केले.
- तापमान वाढल्याने लोकांचा साखर वापर वाढल्याचे निदर्शनास आले, यात प्रामुख्याने सोडा आणि ज्यूससारख्या साखरयुक्त पेयांचा समावेश आहे.
- प्रत्येक १.८ अंश फॅरेनहाइट तापमानाच्या वाढीमुळे, अमेरिकेतील कुटुंबांमध्ये दरडोई दररोज ०.७ ग्रॅम अतिरिक्त साखर वापरली जात असल्याचे आढळले. विशेषतः जेव्हा तापमान ६८ ते ८६ अंश फॅरेनहाइटच्या दरम्यान होते, तेव्हा ही वाढ लक्षणीय होती.
- उष्ण हवामानामुळे शरीरातील पाण्याची पातळी कमी होते, ज्यामुळे लोकांना हायड्रेशन आणि थंडावा देणाऱ्या शीतपेयांची आणि गोड पदार्थांची ओढ लागते, असे या अभ्यासाच्या लेखिका पॅन ही (Pan He) यांनी सांगितले आहे . त्या कार्डिफ विद्यापीठात पर्यावरण विज्ञान आणि शाश्वतता विषयाच्या लेक्चरर आहेत .
वंचित घटकांवर अधिक परिणाम :
या अभ्यासात असेही आढळले आहे की, कमी उत्पन्न असलेल्या किंवा कमी शिक्षण असलेल्या कुटुंबांमध्ये याचा परिणाम अधिक दिसून येतो. अशा गटांमध्ये आधीपासूनच साखरेचा वापर जास्त असतो, कारण साखरयुक्त पदार्थ स्वस्त आणि सहज उपलब्ध असतात. उष्णतेमध्ये त्यांना हेच पदार्थ अधिक आकर्षित करतात. तसेच, या गटातील लोक वातानुकूलित (air-conditioned) जागांमध्ये कमी वेळ घालवतात, असेही संशोधनाने नमूद केले आहे.
केंब्रिज विद्यापीठातील संशोधिका शार्लट कुकोव्स्की यांनी यावर चिंता व्यक्त करताना म्हटले आहे की, “सर्वात असुरक्षित गट – ज्यांच्याकडे जुळवून घेण्यासाठी कमी संसाधने आहेत – ते उष्णतेला जास्त सामोरे जातात आणि त्यांना आहार-संबंधित रोगांचा धोका अधिक असतो”.
भविष्यातील धोके आणि आरोग्य परिणाम :
- जर हवामानातील प्रदूषण असेच अनियंत्रित राहिले, तर २०९५ पर्यंत देशभरात दररोज साखरेचा वापर प्रतीव्यक्ती सुमारे ३ ग्रॅमने वाढू शकतो, असा अंदाज या अभ्यासात वर्तवण्यात आला आहे.
- या वाढत्या साखर वापरामुळे लठ्ठपणा, मधुमेह आणि हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोगांचा धोका वाढतो.
- अमेरिकन हार्ट असोसिएशन पुरुषांसाठी दररोज ३६ ग्रॅमपेक्षा जास्त आणि महिलांसाठी २६ ग्रॅमपेक्षा जास्त साखर न खाण्याची शिफारस करते.
- ही यांच्या मते, “साखर वापराशी संबंधित सार्वजनिक आरोग्य समस्यांवर मोठ्या प्रमाणावर चर्चा झाली आहे, परंतु हवामान बदलाशी त्यांचा संबंध विचारात घेतल्यास परिस्थिती आणखी वाईट होईल” .
धोरणात्मक उपाययोजनांची गरज: जागतिक धोरणकर्त्यांनी हवामान बदलाला सामोरे जाताना साखर व्यवस्थापनाचाही विचार करण्याची गरज आहे, असे पान ही यांनी सुचवले आहे. हवामान बदल मानवी खाण्याच्या सवयींवर कसा परिणाम करेल आणि त्याचे आरोग्य व असमानतेवर काय परिणाम होतील, हे अद्याप पूर्णपणे स्पष्ट नसून, जगभरात यावर अधिक संशोधनाची आवश्यकता असल्याचे त्यांनी अधोरेखित केले आहे.