साखर कारखाने हे निर्विवादपणे ग्रामविकासाचे केंद्रे : अनिल कवडे

पुणे : साखर कारखाने हे निर्विवादपणे ग्रामविकासाचे केंद्रे आहेत. शेतकरी व गावे समृद्ध करण्याची संधी साखर उद्योगाला मिळाली आहे. संचालकांनी या संधीचे सोने करायला पाहिजे. कारखाना किती कोटींची उलाढाल करतो, यापेक्षा आपण किती शेतकऱ्यांचे कल्याण करतो हे मोलाचे असते. त्यामुळे संचालक किंवा कार्यकारी संचालकाने कोणत्याही निर्णयाबाबत गैरसमज होणार नाही, याकरिता सतत दक्ष असायला हवे, असे मत राज्याचे माजी सहकार आयुक्त अनिल कवडे यांनी केले.
पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील सहकार अध्यासनाच्या वतीने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय साखर परिषदेचा समारोप शुक्रवारी (ता. २९) झाला. यावेळी ते बोलत होते.
याप्रसंगी प्र-कुलगुरू डॉ. पराग काळकर, श्रीनाथ म्हस्कोबा साखर कारखान्याचे अध्यक्ष पांडुरंग राऊत, कृषिशास्त्रज्ञ डॉ. सुरेश पवार, साखरतज्ज्ञ डी. एम. रासकर, ‘महिंद्रा अॅण्ड महिंद्रा’चे कृत्रिम बुद्धिमत्ता सल्लागार मंदार गाडगे, परिषदेचे समन्वयक डॉ. अनिल कारंजकर आदी व्यासपीठावर हजर होते.
अनिल कवडे म्हणाले की, “साखर उद्योगासमोर स्थानिक समस्या व धोरणात्मक अडचणी आहेत. मात्र तरीही साखर कारखान्यांच्या संचालकांना नवे तंत्रज्ञान आणि पारदर्शकतेची कास धरावी लागेल. तसेच ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे जबाबदार विश्वस्त म्हणून भूमिका पार पाडावी लागेल. त्यासाठी तुम्हाला प्रत्येक निर्णय पारदर्शकपणे घ्यावा लागेल आणि घेतलेल्या निर्णयाची माहितीदेखील खुलेपणाने शेतकरी वर्गासमोर ठेवावी लागेल.
अनिल कवडे यांचा सल्ला….
ऊस शेतीमधील जमीन पुढे कशी सुपीक राहील, यासाठी उपक्रम हाती घ्यावेत.
एआय, ब्लॉकचेन, आयओटी येतील. मात्र सहकाराचे तत्त्व कायम अग्रेसर राहील.
शेतकरी सभासदांना निर्णय, उपक्रमात विश्वासात घ्यावे.
सहकार व सामुदायिक शेतीसाठी अमूल, चितळे अशा उद्योगांचा अभ्यास करावा
उपपदार्थांकडे वळा व बाजारपेठेत उत्पादनाचा मानदंड तयार करा.
ऊस उत्पादन, कारखाना व्यवस्थापन व विपणनात आधुनिकता आणा.
तंत्रज्ञानाचा अंगीकार, व्यावसायिक दृष्टिकोन, खर्चात कपात करावी.