वजन-काटे प्रमाणित करण्यास वैधमापन कर्मचाऱ्यांची टाळाटाळ

आवडल्यास ही बातमी शेअर करा

साखर संघाची तक्रार, वैधमापन विभागाच्या प्रमुखांना पत्र

पुणे : डिजिटायझेशन करण्यात आलेल्या वजन-काट्यांना संगणक आणि प्रिंटर लावण्याबाबत वैधमापन विभागामुळे निर्माण झालेल्या संभ्रमामुळे महाराष्ट्र राज्य सहकारी साखर कारखाना संघानेही या विभागाला पत्र लिहून लक्ष वेधले आहे.

SANJAY KHATAL

संघाचे व्यवस्थापकीय संचालक संजय खताळ यांनी पत्रात म्हटले आहे की, राज्यातील साखर कारखान्यांनी ऊस वजन काटयाचे डिजिटायझेशन करण्यासंबंधी आपण निर्गमित केलेली SOP प्रणाली अमलात आणली असून आपल्या निर्देशांचे तंतोतंत पालन केले आहे. आपण निर्गमित केलेली SOP ही स्त्युत्यपूर्ण बाब असून ऊस उत्पादक शेतक-यांना ऊसाचे डिजीटल वजन काट्याद्वारे प्रमाणित वजन तात्काळ मिळणे अशी एक अत्यंत पारदर्शक कार्यपध्दती आहे. त्याबद्दल साखर उद्योगाच्या वतीने वैध मापन शास्त्र विभागाचे व विशेषतः आपले मनःपूर्वक कौतुक व साखर संघाच्यावतीने आभार व्यक्त करतो.

तथापि आपल्या खात्यातील क्षेत्रीय स्तरावरील अधिकारी / कर्मचारी SOP प्रणालीचा विपर्यास करून त्यात अंतर्भूत नसलेल्या काही बाबींच्या बाबतीत साखर कारखान्यांना दमदाटी करून डिजीटायझेशन असलेले वजन काटे संगणक व प्रिंटर्सला जोडण्यास मनाई करीत आहेत. तसेच सदर वजन काट्यांचे प्रमाणिकरण करुन देण्यास तयार नाहीत.

वास्तवतः संगणक व प्रिंटर हे डिजिटायझेशनचाच भाग असून, SOP प्रणालीमध्ये देखील उल्लेखित नसलेल्या बाबींसाठी क्षेत्रीय कर्मचाऱ्यांचा हा अट्टाहास अत्यंत खेदजनक आहे. या क्षेत्रीय अधिकाऱ्यांना / कर्मचाऱ्यांना सभासद कारखान्यांनी लेखी पत्र मागणी केली असता असे लेखी पत्र देण्यास त्यांच्याकडून टाळाटाळ होत असून, फक्त तोंडी आदेशान्वये पूर्तता करण्याचा आग्रह होत आहे. हे चुकीचे आहे, असे पत्रात म्हटले आहे.

साखर कारखाने दि. 1 नोव्हेंबर, 2023 पासून सुरु झाले आहेत व शेतकऱ्यांचा ऊस गाळपासाठी घेण्यास देखील सुरुवात झाली आहे. त्या अनुषंगाने शेतकऱ्यांना त्यांच्या मालाचे प्रमाणित वजनाचा दस्त मिळेल याकरिता डिजीटाइज्ड वजन काटे संगणक व प्रिंटरला जोडण्यात आक्षेप असण्याचे कारण नसावे. आपल्या SOP मध्येदेखील डिजिटाइज्ड वजन काटे प्रणीला संगणक व प्रिंटर्स जोडण्यास कोणतीही मनाई करण्यात आलेली नाही, याकडेही पत्रात लक्ष वेधण्यात आले आहे.

आपण आपल्या क्षेत्रीय कर्मचाऱ्यांना वजन काट्यांना संगणक आणि प्रिंटर यांची जोडणी बाबत SOP मध्ये अंतर्भुत नसलेल्या बाबी तोंडी आदेशित करून अट्टाहास न करण्याविषयी सूचित करावे आणि वजन-काटे त्वरित प्रमाणित करुन देण्याबाबत आदेशित करावे, असे आवाहनी संजय खताळ यांनी केले आहे.

यापूर्वी ‘विस्मा’चे अध्यक्ष बी. बी. ठोंबरे यांनीही वैधमापन विभागाला पत्र लिहून या समस्येकडे लक्ष वेधले आहे.

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »