‘साखर सम्राट उद्योजक’ बोत्रे पाटलांवर जयंतभाईंचा कौतुकाचा वर्षाव
पुणे : ओंकार साखर कारखाना ग्रुपचे अध्यक्ष बाबूराव बोत्रे पाटील यांची शिरूर तालुक्यातच नव्हे, तर महाराष्ट्रामध्ये साखर उद्योग क्षेत्रात वेगळी ओळख निर्माण झाली आहे. स्वतःच्या हिमतीवर पाच कारखाने पुण्यामध्ये बसून चालविणे हे काही सोपे काम नाही. बंद पडलेले साखर कारखाने सुरू करून त्यांचा कारभार चांगल्या पद्धतीने सुरू केल्यामुळे भागातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे तसेच कामगारांचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे, असे रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष जयंत पाटील यांनी सांगितले.
हिरडगाव (ता. श्रीगोंदा, जि. नगर) येथील गौरी शुगर डिस्टिलरी प्रायव्हेट लिमिटेड (युनिट नंबर चार) या साखर कारखान्याचे दहा लाखाव्या साखरपोत्याचे पूजन जयंतभाई पाटील यांच्या हस्ते करण्यात आले, त्या वेळी ते बोलत होते.
पाटील म्हणाले की, आपण आपले कर्तृत्व दाखविले, तत्त्वाला ठामपणे राहिल्यानंतर काय होऊ शकते, हे बोत्रे पाटलांनी दाखवून दिले आहे. शेतकऱ्यांची उसाची बिले देखील पंधरा दिवसांनंतर शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होतात, याचा अभिमान वाटतो. साखर कारखान्याला अर्थसाहाय्य देणे हे सगळ्यात चिंतेचे काम आहे. पंचवीस वर्षांच्या कार्यकाळामध्ये बोत्रे पाटील यांचा व्यवहार पाहून बँक जास्त पैसे द्या म्हणून सांगत असताना देखील मी कमी पैसे दिले. सुरुवातीला मी घाबरत होतो. परंतु, सहा महिन्यांनंतर व्यवहार पाहिल्यानंतर चांगल्या पद्धतीने काम असल्यामुळे आम्ही त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहिलो.
ओंकार ग्रुपचे अध्यक्ष बाबूराव बोत्रे पाटील म्हणाले की, महाराष्ट्रामध्ये साखर कारखानदारीत ओंकार ग्रुप द्वितीय क्रमांकावर असून, हा फक्त व्यावसायिक ग्रुप आहे. कर्मचारी, ऊस वाहतूकदार, ऊस उत्पादक शेतकऱ्यांमुळेच खऱ्या अथनि हा दहा लाख साखरपोत्यांचा टप्पा यशस्वी पार केला. कारखान्याकडे तीनशे कोटी रुपयांचा साठा शिल्लक असल्याने शेतकरी, वाहतूकदार, कामगारांनी घाबरून जायचे काही कारण नाही. कोणी काही सांगेल. आता सुरुवातीला बिल देतील, नंतर देणार नाहीत. परंतु, हा फक्त व्यावसायिक ग्रुप असल्याने तसेच मी शेतकऱ्याचा मुलगा असल्याने मला नक्कीच याची जाण आहे.
या वेळी टांझानिया देशाचे माजी खासदार हसानंद मुर्जी, एम. एस. बँकेचे एमडी देशमुख, ओंकार ग्रुपचे सदस्य प्रशांत बोत्रे पाटील, ओमराजे बोत्रे-पाटील, रेखाताई बोत्रे-पाटील, कार्यकारी संचालक आर. डी. यादव, सरपंच चिमाजी दरेकर, सरपंच सचिन चौधरी, हनुमंत मगर, अशोक सस्ते, किरण चव्हाण, संजय तावरे, माऊली जगताप, राजेंद्र बोत्रे, दिगंबर बोत्रे, नवनाथ फराटे, नवनाथ गायकवाड, राजेंद्र बोत्रे, दत्तात्रय बोत्रे, संपत दरेकर, संतोष दरेकर, दादा बनकर, अर्जुन कोळेकर, राहुल गांधले, विजय सुळे आदी ऊस उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.