साखर उद्योगाने विद्यापीठाला विसरू नये : कुलगुरू पाटील
पुणे : साखर उद्योगाच्या भरभराटीत राहुरीच्या म. फुले कृषी विद्यापीठाचे मोलाचे योगदान आहे. मात्र साखर परिषदा जेव्हा आयोजित होतात त्यावेळी साखर कारखान्यांना विद्यापीठाचा विसर पडतो, अशी खंत व्यक्त करून, कृषी विद्यापीठाचे योगदान विसरू नये, असे आवाहन कुलगुरू डॉ. प्रशांतकुमार पाटील यांनी केले.
पुण्यातील कृषी महाविद्यालयात ८ आणि ९ ऑगस्ट रोजी, ‘साखर व संलग्न उद्योगांची चक्रीय अर्थव्यवस्था आणि पर्यावरणपूरक शाश्वततेसाठी योगदान’ या विषयावर दोन दिवसीय परिषदेचे आयोजन केले होते. त्यावेळी कुलगुरू बोलत होते.
यावेळी साखर उद्योगातील अनेक तज्ज्ञ, साखर आयुक्त, साखर, कारखानदार उपस्थित होते. “जमिनीची उत्पादकता कमी होणे, क्षारपड जमिनी होणे, साखर उतारा कमी येणे आणि उसाचा चांगला दर न मिळणे असे अनेक अव्हाने ऊस उत्पादक शेतकऱ्यासमोर आहेत. यामुळे शेतकरी तोट्यात जात असून या प्रश्नावर विचारमंथन व्हावं आणि नवी तंत्रज्ञानाच्या अनुषंगाने शेतकऱ्यांच्या प्रश्नावर धोरणात्मक पातळीवर काहीतर बदल व्हावेत या अनुषंगाने या परिषदेचे आयोजन करण्यात आले, असे पाटील म्हणाले.
“साखर परिषद घेत असताना अनेकदा साखर कारखान्यांना विद्यापीठाचा विसर पडतो. विद्यापीठाच्या अंतर्गत पाडेगाव ऊस संशोधन केंद्र असून त्याला ९२ वर्षे पूर्ण झालेली आहेत. या ठिकाणी १३२ हेक्टर जमीन आहे. या संशोधन केंद्रातून १७ व्हरायटी शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करून दिलेल्या आहेत. या माध्यमातून शेतकऱ्यांच्या जीवनात समृद्धी आली आहे. काही शेतकऱ्यांनी आपल्या घरांना या वाणाची नावं दिली आहेत. त्यामुळे साखर कारखान्यांनी विद्यापीठाच्या संशोधनाला विसरू नये”, असे कुलगुरू म्हणाले.
“महाराष्ट्रात ८६ टक्के उसाचे क्षेत्र हे राहुरी कृषी विद्यापीठाच्या पाडेगाव संशोधन केंद्रातून तयार झालेल्या व्हराटीच्या लागवडीखाली आहे. तर देशातील ५६ टक्के उस क्षेत्रावर पाडेगाव संशोधन केंद्राने विकसीत केलेल्या व्हरायटी आहेत. तर विद्यापीठाने अलीकडेच संशोधित केलेली “१३०७ फुले” ही व्हरायटी सात राज्यांमध्ये प्रथम आलेली आहे. विद्यापीठाने संशोधित केलेल्या व्हरायटी आज महाराष्ट्र, गुजरात, तामिळनाडू, मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश, कर्नाटक, झारखंड या राज्यांमध्ये गेलेल्या आहेत. विद्यापीठाने संशोधित केलेल्या उसाच्या वाणामुळे तुमच्या कारखान्यांचे धुराडे चालू आहेत, अशा शब्दांत पाटील यांनी या मुद्याकडे लक्ष वेधले.
यावेळी साखर आयुक्त कुणाल खेमनार म्हणाले, “ऊस शेती करत असताना पाणी ट्रीटमेंट महत्त्वाचे आहे. साखर उद्योगामध्ये डिजीटल फार्मिंग, तंत्रज्ञान, सेंद्रीय शेती, एकात्मिक शेती या पद्धतीचा वापर करून मातीचे आरोग्य सुधारले पाहिजे. त्याशिवाय नवे संशोधन शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी मर्यादा येतात. साखर उद्योगांना आर्थिक झळ न बसता कमीत कमी खर्चामध्ये वर्षभर कसा नफा कमावता येईल त्यावर साखर आयुक्तालय काम करत आहे.”
ही परिषद महात्मा फुले कृषी विद्यापीठ , कृषी महाविद्यालय पुणे, मिटकॉन कन्सल्टन्सी अँड इंजिनीअरिंग सर्विसेस, साखर आयुक्तालय, दि एन्व्हायरमेंट असोशिएशन ऑफ महाराष्ट्र, कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने कृषी महाविद्यालय पुणे येथे आयोजित करण्यात आली होती.
पर्यावरण मुल्यांकन समितीचे चेअरमन दीपक म्हैसकर, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ सदस्य सचिव अविनाश ढाकणे यांनीही मार्गदर्शन केले. कृषी महाविद्यालयाचे सहयोगी प्राध्यापक धर्मेंद्रकुमार फाळके आणि मिटकॉनचे संदीप जाधव हे या कार्यक्रमाचे निमंत्रक होते.