पुण्यातील साखर उद्योग परिषदेत मान्यवर मार्गदर्शन करणार

आवडल्यास ही बातमी शेअर करा

पुणे: महाराष्ट्रातील साखर उद्योगासाठी एक महत्त्वपूर्ण विचारमंथन घडवून आणणारी ‘राज्यस्तरीय साखर उद्योग परिषद’ येत्या शुक्रवार, दिनांक २९ ऑगस्ट २०२५ रोजी होणार असून, त्यात नामवंत तज्ज्ञ मार्गदर्शन करणार आहेत.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात परिषद होणार आहे. पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील सहकार अध्यासन, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे आणि महाराष्ट्र राज्य सहकारी साखर कारखाना संघ यांच्या संयुक्त विद्यमाने या परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या परिषदेचे मुख्य उद्दिष्ट “साखर उद्योगाच्या उत्कर्षासाठी अर्थकारणाची दिशा” या विषयावर सखोल चर्चा करणे हे आहे. ही परिषद सकाळी १०.०० ते सायंकाळी ५.०० या वेळेत पार पडेल.

उद्घाटन आणि प्रमुख उपस्थिती:

या परिषदेचे उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे साखर आयुक्त सिद्धाराम सालीमठ (भा.प्र.से.) यांच्या हस्ते होणार आहे. परिषदेचे अध्यक्षस्थान सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू मा. प्रा. (डॉ.) सुरेश गोसावी भूषवतील. प्रमुख पाहुण्यांमध्ये महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे प्रशासक प्रा. श्री. विद्याधर अनास्कर, विस्मा (WISMA) व नॅचरल शुगर लिमिटेडचे अध्यक्ष बी. बी. ठोंबरे आणि यशदाचे अतिरिक्त महासंचालक तथा माजी साखर आयुक्त शेखर गायकवाड यांचा समावेश आहे.

या राज्यस्तरीय परिषदेत अधिकाअधिक साखर कारखाना प्रतिनिधींनी सहभागी व्हावे आणि त्यासाठी २५ ऑगस्टपूर्वी नोंदणी करावी, असे आवाहन निमंत्रक सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. पराग काळकर, राज्यपाल नियुक्त व्यवस्थापन समिती सदस्य डॉ. रविंद्र शिगणापूरकर आणि पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील सहकार अध्यासनाचे प्राध्यापक प्रा. (डॉ.) अनिल कारंजकर यांनी केले आहे.

चर्चासत्रांमध्ये सहभागी होणारे मान्यवर: या परिषदेतील उद्घाटन सत्रानंतर दिवसभराच्या विषयवार चर्चासत्रांमध्ये विविध क्षेत्रांतील अनेक नामवंत मान्यवर उपस्थित राहून मार्गदर्शन करतील. यामध्ये खालील प्रमुख व्यक्तींचा समावेश आहे:

  • सतीश मराठे, संचालक, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, मुंबई
  • बी. बी. ठोंबरे, अध्यक्ष, विस्मा व नॅचरल शुगर अँड अलाईड इंडस्ट्रीज
  • डॉ. पांडुरंग राऊत, सचिव, विस्मा व अध्यक्ष, श्रीनाथ म्हस्कोबा साखर कारखाना
  • अनिल कवडे, आयुक्त, सहकारी निवडणूक महाराष्ट्र
  • प्रकाश नाईकनवरे, व्यवस्थापकीय संचालक, राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना संघ
  • संजय खताळ, व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य सहकारी साखर कारखाना संघ
  • अजित चौगुले, कार्यकारी संचालक, विस्मा (WISMA)
  • सीए रामचंद्र माहुली, कार्यकारी संचालक, राजारामबापू सहकारी साखर कारखाना
  • डी. एम. रासकर, मुख्य कार्यकारी अधिकारी, श्रीनाथ म्हस्कोबा साखर कारखाना
  • दिलीप पाटील, सहअध्यक्ष, इंडियन फेडरेशन ऑफ ग्रीन एनर्जी
  • डॉ. सुरेश पवार, माजी शास्त्रज्ञ, ऊस विकास केंद्र, पाडेगाव

ही परिषद साखर उद्योगाच्या सद्यस्थिती आणि भविष्यातील वाटचालीसंदर्भात अर्थकारणाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण दिशा देईल अशी अपेक्षा आहे.

नावनोंदणीसाठी खालील गुगल फॉर्म लिंकवर क्लिक करा, तसेच नोंदणीमध्ये काही अडचण आल्यास 8007725088, 8999776721 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन संयोजकांनी केले आहे.

https://forms.gle/gyfRsNRFFjwAnPUR6

आणखी संबंधित बातमी वाचा खालील लिंकवर

पुणे विद्यापीठात २९ ऑगस्ट रोजी राज्यस्तरीय साखर उद्योग परिषद

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »