पंतप्रधान मोदी यांना साखर उद्योगाचे शिष्टमंडळ भेटणार

पुणे : ब्राझिल दौऱ्यानिमित्त साखर उद्योगाच्या ज्या अडचणी आता समोर आलेल्या आहेत, त्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय सहकारमंत्री अमित शहा यांची भेट घेऊन ते प्रश्न सोडविण्यासाठी माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील साखर उद्योगाचे शिष्टमंडळ लवकरच दिल्ली येथे जाऊन भेट घेणार आहेत. तत्पूर्वी, यासंदर्भात् मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्याशीही चर्चा करण्यात येणार असल्याचे राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांनी सांगितले. राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघ, व्हीएसआय आणि राज्य सहकारी साखर कारखाना संघ यांच्या वतीने आयोजित केलेल्या एका संयुक्त बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते.
ब्राझिलच्या सीटीसी आणि ‘व्हीएसआय’मध्ये होणार करार
दरम्यान, राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघ, व्हीएसआय, राज्य सहकारी साखर कारखाना संघ यांच्यावतीने साखर संकुल येथे वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी (दि. २) दुपारी संयुक्त बैठकीचे आयोजन करण्यात आले. या बैठकीत ब्राझिलमधील सीटीसी संस्था आणि मांजरी येथील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये (व्हीएसआय) तंत्रज्ञानाबाबतचा आंतरराष्ट्रीय करार करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ब्राझिल येथे सीटीसी नावाची खासगी संशोधन संस्था कार्यरत आहे. या संस्थ्ोकडून दरवर्षी उसाच्या दोन ते तीन नव-नवीन जाती प्रसारित होत असतात. त्यामुळे या तंत्रज्ञानाबाबतचा हा करार करण्याचा एकमताने निर्णय झाला आहे.
या महत्त्वपूर्ण अडीच तास चाललेल्या बैठकीला वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष शरद पवार, नवी दिल्ली येथील राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील, ‘व्हीएसआय’चे उपाध्यक्ष दिलीप वळसे पाटील, ‘व्हीएसआय’चे विश्वस्त जयंत पाटील, राजेश टोपे, जयप्रकाश दांडेगावकर, आमदार अभिजित पाटील, इंद्रजित मोहिते, अशोक पवार, साखर महासंघाचे व्यवस्थापकीय संचालक प्रकाश नाईकनवरे, व्हीएसआयचे महासंचालक संभाजी कडू पाटील, राज्य सहकारी साखर कारखाना संघाचे पदाधिकारी आदी मान्यवर उपस्थित होते.
बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना साखर महासंघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांनी सांगितले की, राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाच्या वतीने सहा दिवसांचा ब्राझिल येथील साखर उद्योगाचा अभ्यास दौरा नुकताच झाला. त्याची माहिती बैठकीत विस्ताराने दिली आहे. तेथे भारतीय शिष्टमंडळाने अनेक कारखाने व संस्थांना भेटी दिल्या आहेत. ब्राझिलमध्ये ३६५ साखर कारखाने आहेत. सुमारे ३ लाख ६० हजार कोटी रुपयांची वार्षिक उलाढाल होत असून, त्यामध्ये ७० हजार शेतकरी ऊस पिकवितात. त्यापैकी ७० टक्के कारखान्याचे मालक असून, ३० टक्के कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग करणारे आहेत. तेथील सरकारचे कोणतेही नियंत्रण साखर उद्योगावर नाही. तेथे इंधनांमध्ये ३५ टक्के इथेनॉल मिश्रण करतात. ब्राझिलमध्ये यांत्रिकीकरणाद्वारे ऊस लागवड, ऊस तोडणीवर शंभर टक्के भर आहे. ब्राझिलमधील शास्त्रज्ञ व्हीएसआयमध्ये बोलवावेत, तेथील कौशल्यावर आधारित मनुष्यबळ वाढविण्यावर भर देणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.