गाळप हंगाम ८३ दिवसांवर ; कमी उत्पादनामुळे कारखाने अडचणीत

पुणे : यंदा सरासरी गाळप हंगामाचा कालावधी ८३ दिवसांवर आल्याने त्याचा विपरीत आर्थिक परिणाम सर्व कारखान्यांसाठी चिंतादायक आहे. राज्यातील २०० साखर कारखान्यांचा गाळप हंगाम हा सरासरी १४० ते १५० दिवस चालला, तरच अर्थकारण टिकणारे राहते. सुमारे ८० लाख टनांइतक्याच कमी साखर उत्पादनामुळे संपूर्ण साखर उद्योग आर्थिक अडचणीत सापडला आहे, असे राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांनी सांगितले..
ते म्हणाले, देशातील यंदाचा २०२४-२५ चा साखर हंगाम सुरुवातीपासूनच ऊस उपलब्धता आणि अपेक्षित साखर उत्पादनाच्या सतत बदलत गेलेल्या आकडेवारीच्या गर्तेत अडकलेला राहिला आहे. साखर उत्पादनाची संभ्रमावस्था अजूनही कायम आहे. काही साखर संस्थांनी मूळच्या केलेल्या साखर उत्पादनाच्या ३३० लाख टनाच्या अंदाजात झपाट्याने बदल होत गेले. केंद्राने १० लाख टन साखर निर्यातीला दिलेल्या परवानगीनंतर बाजारातील साखर दर सुधारण्यास निश्चित मदत झाली आहे.
का घटतेय ऊस उत्पादन?
-उत्तर प्रदेशातील बहुसंख्य ऊस क्षेत्र व्यापलेल्या को- ०२३८ या उसावर लाल कुज (रेड रॉट) आणि टॉप शूट बोररचे (अळी) आक्रमण.
-महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यातील उभ्या उसावर आलेला फुलोरा व त्यामुळे खुंटलेली वाढ.
पुढील हंगाम आशादायक
२०२४ मधील समाधानकारक पर्जन्यवृष्टीमुळे उसाच्या नव्या लागणी मोठ्या प्रमाणावर झाल्या आहेत. तसेच, प्रमुख जलाशयातील पाण्याच्या साठ्यांमुळे यंदा तुटला गेलेल्या उसाचा खोडवा पुढील गाळप हंगामाच्या उत्तरार्धात उपलब्ध होईल. त्यातच यंदाही देशात पाऊसमान समाधानकारक असण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. त्या प्रमाणे घडल्यास उभ्या उसाच्या वाढीला आणि साखर उत्पादनाला चालना मिळेल, असे मत राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे व्यवस्थापकीय संचालक प्रकाश नाईकनवरे यांनी व्यक्त केले.