व्हाट्सॲप ग्रुपवर व्याख्यानमाला, शुगर इंडस्ट्रीज परिवाराचा अनोखा उपक्रम

आवडल्यास ही बातमी शेअर करा

पुणे : साखर उद्योग क्षेत्रातील तब्बल दहा हजारांहून अधिक सदस्यांना, माहिती अदान-प्रदानासाठी, एकत्र बांधून ठेवणाऱ्या ‘शुगर इंडस्ट्रीज परिवार’ या समूहाने दहाव्या वर्धापन दिनानिमित्त खास व्याख्यानमालेचे आयोजन केले. त्यात या क्षेत्रातील दहा नामवंतांनी सहभाग घेऊन मार्गदर्शन केले.

साखर उद्योग क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणारे दिवंगत अविनाश कुटे यांनी १५ मार्च २०१५ रोजी शुगर इंडस्ट्रीज परिवार या ‘Whatsapp’ची ग्रुपची स्थापना केली. या क्षेत्रातील माहिती संबंधित घटकांना तातडीने उपलब्ध व्हावी, त्यांच्या शंकांचे निरसन व्हावे आणि एकंदरित साखर उद्योगाच्या विकासासाठी सर्व घटकांचा हातभार वृद्धिंगत व्हावा, हा या ग्रुपच्या स्थापनेमागील त्यांचा उद्देश होता.

Dilip Ware
दिलीप वारे

अविनाश कुटे यांचे कोरोना काळात दु:खद निधन झाले. त्यांचा वारसा दिलीप वारे यांनी पुढे नेत, या ग्रुपचा आणखी विस्तार केला आहे. ग्रुपला दहा वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने, ग्रुपचे संस्थापक कै. कुटे यांच्या स्मृतिदिनाचे औचित्य साधत श्री. वारे यांनी व्हॉट्‌सॲप ग्रुपवरील या आगळ्यावेगळ्या व्याख्यानमालेचे आयोजन केले. १५ मार्च ते २९ मार्च दरम्यान ही व्याख्यानमाला पार पडली.

या व्याख्यानमालेत नॅचरल शुगरचे सीएमडी बी. बी. ठोंबरे, स्पायका ग्रीन एनर्जीचे सीएमडी बापूसाहेब गायकवाड, श्रीनाथ म्हस्कोबा साखर कारखान्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी डी. एम. रासकर, नामवंत तंत्र सल्लागार वा. र. आहेर, विलास सहकारी साखर कारखान्याचे माजी सरव्यवस्थापक एम. पी.बोरखडे, छत्रपती राजाराम सह. साखर कारखान्याचे माजी एमडी पी. जी. मेढे, विद्यमान एमडी अनंत निकम, अगस्ती सह. सा. कारखान्याचे माजी सरव्यवस्थापक सुभाषराव पोखरकर, एनएसल शुगरचे उपसरव्यवस्थापक (केन) अंबरिश कदम आणि सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याचे एमडी समीर सलगर या मान्यवरांनी व्याख्यानमालेत सहभाग घेतला.

या व्याख्यात्यांनी साखर कारखानदारी विषयी सद्यस्थिती व भविष्यातील वाटचालीबाबत अभ्यासू मते मांडली आणि संभाव्य अडचणींवर उपायही सुचवले. व्याख्यानमाला ११ दिवस चालली आणि तिला खूप चांगला प्रतिसाद मिळाला. अनेक सदस्यांनी काही मुद्दे उपस्थित करत शंकानिरसन करून घेतले.

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »