साखरेचे दर दोनशे रुपयांनी गडगडले!
मुंबई : खुल्या बाजारातील साखरेचे दर प्रति क्विंटल २०० रुपयांनी गडगडल्याने साखर उद्योग क्षेत्रात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. या हंगामातील एफआरपी परिपूर्तता करण्यावर त्याचा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
लोकसभेच्या निवडणुका एप्रिल २०२४ मध्ये हेाण्याचे संकेत आहेत. त्यामुळे शासनाकडूनही साखर दरामध्ये फार वाढ न होण्याच्या दृष्टिकोनातून खबरदारी घेण्याची शक्यता नाकारता येत नाही. तेव्हा साखरेच्या दरातील घसरण थांबविण्यासाठी साखर संघ व विस्माकडून फेब्रुवारी २०२४ साठी खुला होणारा कोटा कमी करण्याबाबत विनंती करण्यात येत आहे.
कारण हंगामाच्या सुरुवातीस केलेल्या अंदाजापेक्षा राज्यात साखर उत्पादनात वाढ होताना दिसत आहे. शिवाय केंद्र शासनाने इथेनॅालसाठी जाणारी ३५ लाख टन साखर वर्ग केली आहे. त्यामध्ये ५० टक्के कपात करून ती १७ लाख टन इतकीच निश्चित केलेली आहे. शिवाय साखर निर्यातीस बंदी आहे. त्यामुळे देशात साखरेची पुरेशी उपलब्धता हेाणार आहे. इथेनॅाल उत्पादनात कपात झाल्याने मात्र कारखान्यांच्या उत्पन्नात घट होणार आहे.
साखरेचा प्रतिक्विंटल ३६५० रुपये असलेला दर बुधवारी ३४५० रुपयांपर्यंत खाली आला. केंद्र सरकारने यावर्षीच्या गाळप हंगामात म्हणजे आक्टेाबर २०२३ ते जानेवारी २०२४ या चार महिन्यांसाठी एकूण ९९ लाख टन साखर कोटा कारखान्यांना खुल्या बाजारात विक्रीसाठी दिलेला आहे. गत गाळप हंगामात याच चार महिन्यांसाठी ८९.५ लाख मे. टन कोटा दिला हेाता. म्हणजे जवळ १० टक्के जादा साखरेचा कोटा बाजारात सोडलेला आहे.
या सर्व स्थितीता विचार करून केंद्राने बाजारातील साखरेचे भाव किफायतशीर पातळीवर राहून कारखान्याना ऊसाची बिले मुदतीत देण्यासाठी अडचणी येणार नाहीत यासाठी फेब्रुवारी २०२४ चा साखरेचा येाग्य असाच कोटा निश्चित करणे जरूरीचे आहे. जादा कोटा दिल्यास साखरेचे दर आणखी घसरतील. परिणामी बॅंका साखर माल तारण कर्जासाठी निश्चित केलेला दर कमी करण्याची शक्यता आहे. तसे झाल्यास ऊस बिले देण्यासाठी जास्त रक्कमेची कमतरता भासेल, अशी भीती साखर उद्योग क्षेत्रातील नामवंत आणि ‘विस्मा’चे अध्यक्ष बी. बी. ठोंबरे यांनी व्यक्त केली.