१३२ साखर कारखान्यांवर कोटा कपातीची कारवाई
डिसेंबरचा साखर कोटा दोन लाख टनांनी घटवला
नवी दिल्ली : केंद्राने डिसेंबर २०२४ साठी २२ लाख टनांचा साखर कोटा जाहीर केला आहे. गेल्या डिसेंबरच्या तुलनेत तो दोन लाख टनांनी कमी आहे. सध्या साखरेचे दर देशात सरासरी ३३०० ते ३४०० रुपये प्रति क्विंटल इतके आहेत. दरम्यान, १३२ कारखान्यांवर कारवाई करत, त्यांचा कोटा केंद्राने कमी केला आहे.
एक महिन्यापूर्वी उत्तर प्रदेशात, तर महाराष्ट्र, कर्नाटक या प्रमुख राज्यांमध्ये आठ ते दहा दिवसांपासून साखर हंगाम सुरू झाला. गेल्या वर्षीच्या तुलनेत साखरेचे उत्पादन यंदा काहीशी कमी होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. गेल्या वर्षी साखरेपासून इथेनॉल करण्याला मर्यादित परवानगी होती. यंदा मात्र इथेनॉलवरील सर्व निर्बंध काढून टाकण्यात आल्याने साखरेचे उत्पादन कमी होईल अशी शक्यता आहे. साखरेचे उत्पादन कमी असले तरी गेल्या वर्षीची शिल्लक साखर जास्त आहे. यामुळे साखरेचे उत्पादन घटले तरी साखरेची टंचाई जाणवणार नाही अशी स्थिती आहे.
या वर्षी इथेनॉलवरील निर्बंध हटवल्याने ज्या साखर कारखान्याचे इथेनॉल प्रकल्प आहेत त्यांना मात्र दिलासा मिळेल. सरकारकडून इथेनॉलच्या किमती वाढवण्याबाबत विचार सुरू आहे. इथे इथेनॉलच्या किमती वाढल्यास अनेक कारखाने साखरेपेक्षा इथेनॉल निर्मितीला प्राधान्य देऊन साखरेतील तोटा भरून काढण्याचा प्रयत्न करू शकतात, असे साखर उद्योगातून सांगण्यात आले. येत्या महिनाभरात साखरेचे उत्पादन वाढल्यानंतर किमतीत आणखी घसरण होऊ शकते अशी भीतीही साखर उद्योगातील सूत्रांनी व्यक्त केली.
केंद्राने साखर निर्यातीबाबत काहीच भाष्य केलेले नाही. थोड्या प्रमाणात तरी साखर निर्यातीला परवानगी द्यावी अशी मागणी साखर उद्योगाची आहे.
सरकारने वारंवार सांगूनही कारखान्यांनी स्टॉक होल्डिंगची मर्यादा न पाळल्याबद्दल केंद्राने देशातील १३२ साखर कारखान्यांचा कोटा घटवला आहे. या कारखान्यांनी दिलेल्या कोट्यापेक्षा जास्त साखर विक्री केल्याचे निदर्शनास आल्यानंतर केंद्राने ही कारवाई केली आहे. केंद्राने सातत्याने कारखान्यांना सांगूनही अनेक कारखाने केंद्राचा आदेश पाळत नसल्याने ही कारवाई करावी लागत असल्याचे अन्न आणि सार्वजनिक वितरण विभागाने म्हटले आहे.