मुबलक कोट्यानंतरही साखर दरात तेजी
नवी दिल्ली : केंद्र सरकारने मे महिन्यासाठी 27 लाख टन साखरेचा कोटा खुला करूनही, साखरेत तेजी आहे. साखरेचा दर 75 रुपयांनी वाढून क्विंटलला 3900 ते 3950 रुपयांवर पोहोचला आहे.
मे महिन्यात साखरेची मागणी वाढते हे लक्षात घेऊन केंद्र सरकारने पुरेसा कोटा खुला केला आहे. त्यामुळे दरांवर परिणाम होईल, अशी शक्यता वर्तवण्यात येत होती.
मात्र, साखरेच्या निविदाही क्विंटलला 3600 ते 3650 रुपयांवर पोहोचल्या आहेत. सट्टेबाजांची सक्रियता हे त्यामागे महत्त्वाचे कारण सांगितले जात आहे. साखर हंगाम संपुष्टात आल्यामुळे कारखान्यांकडूनही जादा दरात साखर विक्रीला प्राधान्य दिले जात असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे ऐन लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत साखरेच्या दरातील तेजी हा सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. त्यामुळे मागणी वाढल्यास साखरदरातील तेजी कायम राहण्याचा अंदाज जाणकार व्यापार्यांकडून वर्तविण्यात येत आहे.