ऑगस्टमधील साखर विक्रीचा कोटा जाहीर

पुणे : बाजारातील साखरेचे दर स्थिर राहावेत, तसेच मागणीच्या तुलनेत पुरवठा कमी-जास्त होऊ नये, यासाठी केंद्र सरकार दर महिन्याला साखर विक्रीचा कोटा जाहीर करत असते. याप्रमाणे ऑगस्ट २०२५ साठी सरकारने २२.५ लाख मेट्रिक टन साखर विक्रीचा कोटा जाहीर केला आहे. ऑगस्ट २०२४ मध्ये हाच कोटा २२ लाख मेट्रिक टन होता, तर ऑगस्ट २०२३ मध्ये तो २५ लाख मेट्रिक टन होता. मात्र, ऑगस्ट महिन्यात मागणी जास्त असतानाही पुरवठा कमी केल्याने सदर कोटा वाढवून मिळावा, अशी मागणी होत आहे.
सध्या सणासुदीचे दिवस आहेत. ऑगस्ट महिन्यामध्ये तर महत्त्वाचे सण असतात. त्यात श्रावण महिना तसेच गणेशोत्सवासह अन्य सणांची रेलचेल असते. या काळात साखरेच्या मागणीत अन्य महिन्यांच्या तुलनेत अधिक वाढ होत असते. विशेषतः महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा व पश्चिम भारतात साखरेची मागणी मोठी असते. त्यात गणेशोत्सव यंदा लवकर येत असल्याने ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात मागणी वाढण्याची दाट शक्यता वर्तविण्यात येत आहे. हा कोटा राष्ट्रीयस्तरावर संतुलित वाटत असला, तरी स्थानिक बाजारपेठांमध्ये त्यामुळे तणाव निर्माण होऊ शकतो.
व्यापारी व घाऊक ग्राहक यांच्याकडून ऑगस्टपासून साखरेची साठवणूक करू शकतात, त्यामुळे किमतीत थोडी वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे साखर उद्योग व व्यापार क्षेत्रातील घटकांनी मागणीचा कल व पुरवठा साखळी यावर बारकाईने लक्ष ठेऊन सणासुदीच्या काळात साखरेचा नियमित पुरवठा सुनिश्चित करता येईल, असे साखर उद्योगातील काही अभ्यासकांनी आपली मते मांडली आहेत.
दरम्यान, साखरेचा हमीभाव २०१९ मध्ये सरकारने वाढवला. तेव्हापासून हा दर प्रतिक्विंटल ३१०० रुपये एवढाच आहे. उसाची एफआरपी व साखर उत्पादनाचा खर्च वाढला आहे, काही कारखान्यांनी सहवीज प्रकल्प सुरू केल्याने त्यांच्यावरील कर्जाचा बोजा वाढून हप्ताही वाढला आहे. अशा परिस्थितीत उसाची एफआरपी देताना कारखान्यांसमोर मोठे आव्हान असते. त्यामुळे या हमीभावातही वाढ करण्याची मागणी साखर उद्योगातून होत आहे.